दिंडोरीच्या गटविकास अधिकाऱ्यांना ‘समज’
By admin | Published: June 24, 2014 08:51 PM2014-06-24T20:51:52+5:302014-06-25T00:14:44+5:30
आमदार धनराज महालेंसह माकपचे शिष्टमंडळ भेटले सीईओंना
नाशिक : दिंडोरी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत विभागातील संग्राम कक्षातील संगणक परिचालकांना गटविकास अधिकारी टी.झेड. मोहिते यांनी अर्वाच्च भाषा वापरल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी मुख्यालयात बोलावून ‘समज’ दिली.
विशेष म्हणजे या प्रकरणी राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरीतील ७० संगणक परिचालकांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून दिंडोरी गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच त्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना निवेदन देऊन गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या अर्वाच्च शिवीगाळ बद्दल तत्काळ समज देऊन कारवाई न केल्यास जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. यावेळी संग्रामचे जिल्हा समन्वयक नीलेश कर्पे, शिवाजी पवार यांच्यासह ७० संगणक परिचालक उपस्थित होते. यावेळी आमदार धनराज महाले व जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, प्रवीण जाधव, सुभाष गांगुर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम शेलार यांनीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर तत्काळ सुखदेव बनकर यांनी गटविकास अधिकारी टी. झेड. मोहिते यांना मुख्यालयात बोलावून त्यांना विचारणा केली असता त्यांनी आपण रागाच्या भरात बोलल्याची कबुली दिली. यापुढे असे घडता कामा नये, अशी समज सुखदेव बनकर यांनी मोहिते यांना दिली.(प्रतिनिधी)