Dindori Nagar Panchayat Election Result: एकच चर्चा! सख्ख्या जावा एकमेकींविरोधात लढल्या; निकालात तिसराच विजयी झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 07:35 PM2022-01-19T19:35:14+5:302022-01-19T19:35:40+5:30
दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ होतो याची प्रचिती प्रभाग क्र ७ च्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाली.
नाशिक – जिल्ह्यातील ६ नगरपंचायतीचे निकाल घोषित झाले त्यात भाजपाकडे २, राष्ट्रवादीकडे २ तर शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्याकडे प्रत्येकी १ नगर पंचायत आली आहे. दिंडोरी नगर पंचायतीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीकडे सत्ता आली आहे. याठिकाणी एकूण १७ जागांपैकी शिवसेना ६, राष्ट्रवादी ५, काँग्रेस २ तर भाजपा ४ जागांवर विजयी झाली आहे.
या निवडणुकीत घडलेल्या एका प्रकाराची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. दिंडोरी नगर पंचायतीतील प्रभाग क्र ७ मध्ये राजश्री सतीश देशमुख आणि संगीता प्रमोद देशमुख या सख्ख्या जावा एकमेकांसमोर उभ्या होत्या. राजश्री यांनी शिवसेनेकडून तर संगीता यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली. देशमुख घराण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. निवडणुकीच्या निकालापर्यंत या घरातील सदस्यांमध्ये धाकधुक होती. प्रभाग क्रं ७ मध्ये कोण बाजी मारणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
पण म्हणतात ना दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ होतो याची प्रचिती प्रभाग क्र ७ च्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाली. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि कधी राजश्री तर कधी संगीता आघाडीवर होत्या. परंतु निकाल जसजसा जवळ आला तसं चित्र स्पष्ट झालं. या निवडणुकीच्या निकालात राजश्री देशमुख आणि संगीता देशमुख या जावा बाजूलाच राहिल्या अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार लता बोरस्ते यांनी विजय मिळवला. लता बोरस्ते यांना सर्वाधिक ३१२ मते पडली तर राजश्री देशमुख यांना ६२ आणि संगीता देशमुख यांना २३८ मते पडली. देशमुख घराण्यातील या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला अशी चर्चा दिंडोरीत सध्या सुरु आहे.
दिंडोरी नगरपंचायतनिकाल
शिवसेनेला सर्वाधिक जागा, महाविकास आघाडीकडे सत्ता
एकूण जागा - 17
राष्ट्रवादी - 05
शिवसेना - 06
काँग्रेस - 02
भाजपा - 04