दिंडोरीरोडला कचऱ्याचे ढिगारे पडून
By Admin | Published: December 27, 2015 10:19 PM2015-12-27T22:19:42+5:302015-12-27T22:21:44+5:30
दिंडोरीरोडला कचऱ्याचे ढिगारे पडून
पंचवटी : महापालिका प्रशासनाने पंचवटी विभागातील कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्या नेमल्या असल्या तरी या घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमार्फत काही ठिकाणच्या रस्त्यालगतच कचरा उचलला जात नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा पडून असल्याचे चित्र दिंडोरीरोड परिसरात दिसून येत आहे.
विशेष म्हणजे मनपाने ज्या ठेकेदाराला हे काम दिले आहे त्या ठेकेदाराकडूनच पंचवटीत व्यवस्थितपणे घंटागाड्यांचे नियोजन केले जात नसल्याने पंचवटीत घंटागाड्यांचे नियोजन खोळंबत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दिंडोरीरोड परिसरातील मायको दवाखाना समोरील रस्ता, दिंडोरीरोड परिसरातच महापालिकेने पादचाऱ्यांसाठी तयार केलेल्या पादचारी मार्गावरही कायमच कचरा पडून राहत असला तरी मनपाच्या आरोग्य विभागाचे लक्ष वेधले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पंचवटीत गेल्या काही दिवसांपासून घंटागाड्यांचे नियोजन नसल्याने पुन्हा कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने वेळीच लक्ष केंद्रित करून घंटागाड्यांचे व्यवस्थित नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली
आहे. (वार्ताहर)