दिंडोरी तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:00+5:302021-06-25T04:12:00+5:30
दिंडोरी : तालुक्यात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण घटत असून वणी व दिंडोरी येथील कोविड सेंटर ओस पडले आहेत. ...
दिंडोरी : तालुक्यात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण घटत असून वणी व दिंडोरी येथील कोविड सेंटर ओस पडले आहेत. अनेक गावे कोरोनामुक्त झाली असली तरी तालुक्यात अजूनही ५० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. घरच्या घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४८ असून एक पॉझिटिव्ह रुग्ण बोपेगाव कोविड सेंटर येथे उपचार घेत आहे. एक रुग्ण नाशिक येथे खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळाला. अनेक ज्येष्ठ नागरिकांचा कोरोना विषाणूच्या धसक्याने मृत्यू झाला. तालुक्यात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाने १३२ रुग्णांचा मृत्यू झाला असून तालुक्यात ७३१५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, पैकी ७१३३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या जरी विषाणूचे प्रमाण घटताना दिसत असले तरी तपासणी न करता सौम्य लक्षणे असणारे लोक घरी औषधोपचार घेत आहेत. त्यामुळे अजूनही ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबताना दिसत नाही. ग्रामीण भागात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने चांगले थैमान घातले असून अनेक कुटुंबांतील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबे निराधार झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. शेतकरी व शेतमजूर यांचेही मोठ्या प्रमाणात हाल पाहण्यास मिळाले. आजमितीस कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
-------------------
सध्या दिंडोरी तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले आहे. तालुक्यात ठिकठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जनतेने प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन लस घ्यावी. त्याप्रमाणे कोरोना विषाणूचा धोका आजही कायम असून घराबाहेर पडताना लोकांनी मास्क व सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व सुरक्षित अंतर ठेवावे.
- डॉ. सुजीत कोशिंरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, दिंडोरी