दिंडोरी तालुक्यात पेरण्यांची लगीनघाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 10:57 PM2021-06-21T22:57:08+5:302021-06-22T00:15:37+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला असून आता खरीप हंगामातील पेरण्यांची तालुक्यात लगीनघाई सुरू झाली आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला असून आता खरीप हंगामातील पेरण्यांची तालुक्यात लगीनघाई सुरू झाली आहे.
मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतकरी वर्गाने यांत्रिकी साधनांनी पूर्ण करून घेतली होती. त्यानंतर पावसाने लहरीपणा दाखवत दडी मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे बळीराजाच्या या लगीनघाईला यामुळे आडकाठी निर्माण झाली.
कारण जमिनीतील पेरणीला जी ओल पाहिजे ती प्रमाणापेक्षा कमी होती. त्यामुळे अतिशय महागडे बियाणे खरेदी करून पेरणीचा वापसा नसल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला. आता दोन दिवसांपासून तालुक्याच्या बहुतेक भागात पावसाला सुरुवात झाल्याने पुन्हा बळीराजाची पेरणीसाठी धावपळ सुरू झाली आहे.
यंदाच्या हंगामात बहुतेक शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन पिके घेण्यावर भर देत आहेत. सध्या सोयाबीन, मका व वेगवेगळ्या स्वरूपांचा भाजीपाला इ. पिकांकडे मोठ्या प्रमाणावर कल पाहायला मिळत आहे. आता दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्याने पुन्हा खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे.
बाजरीकडे फिरविली पाठ
दिंडोरी तालुक्यातून बाजरी पीक नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे. मागील हंगामात शेतकरी वर्गाने बाजरी पीक अल्प प्रमाणात घेतले होते. कारण बहुतेक भागात उन्हाळ बाजरी घेतली जाते. त्यामुळे खरीप हंगामात बाजरी ही कमी प्रमाणात घेतली जाते.
यंदाच्या खरीप हंगामात नगदी भांडवल उपलब्ध करून देणाऱ्या पिकांची निवड शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कारण कोरोनामुळे सध्या भांडवलाची कमतरता जाणवू लागल्याने कमी खर्च लागणाऱ्या भाजीपाला पीक घेण्याकडे आमचा कल आहे. त्यात वांगी, कोबी, वाल, टमाटे व इतर भाजीपाल्याचा समावेश आहे.
- दिलीपराव सोनवणे, शेतकरी, लखमापूर