दिंडोरी तालुक्यात चाऱ्याअभावी जनावरांची भटकंती सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 04:42 PM2019-06-17T16:42:56+5:302019-06-17T16:43:24+5:30
दिंडोरी : तालुका बागायती असून द्राक्ष,ऊस भाजीपाला मोठ्या प्रमाणात आहे मात्र यंदा अद्याप पाऊस न आल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. परिणामी ऊसाचे पीक पाण्याअभावी वाळू लागले असून सर्व नदी पात्र कोरडे झाल्याने पाणी, चा-यासाठी जनावरांची भटकंती सुरू झाली आहे.
गेल्यावर्षी दिंडोरी तालुक्यात सरासरी पाऊस झाला मात्र भिज पाऊस व परतीचा पाऊस न झाल्याने भूजल पातळी खोल गेली आहे. विहिरींनी तळ गाठला असून बोअरवेलही आटले आहेत. त्यातच सर्व धरणांनीही तळ गाठला असून सर्व नदीपात्र कोरडे पडले आहेत. दरवर्षी साधारण मेच्या उत्तरार्धात वळवाचा पाऊस तर जूनमध्ये मोसमी पाऊस सुरू होतो यंदा मात्र अद्याप पाऊस न आल्याने पाणीटंचाई भासत आहे . द्राक्ष बागांना ठिबकद्वारे पाणी देत बागा जिवंत ठेवण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यासाठी ऊस व इतर पिके वाºयावर सोडावी लागत आहे. अवनखेड परिसरात ऊस पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. तालुक्यात राजस्थानमधील गायी मोठ्या प्रमाणात आहेत मात्र चारा व पाणी उपलब्ध नसल्याने त्यांना भटकंती करावी लागत आहे. काही शेतक-यांनी ठिबकद्वारे टोमॅटो लागवड केली मात्र पाऊस नसल्याने पीक वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळा सुरु होऊन दहा दिवस उलटून गेले तरी पाऊस न आल्याने शेतक-यांना पावसाची प्रतीक्षा आहे.