दिंडोरी तालुक्यात नदी-नाल्यांना पूर
By admin | Published: July 10, 2016 11:01 PM2016-07-10T23:01:16+5:302016-07-10T23:04:30+5:30
बाजारकरूंची गैरसोय : शहरातील मुख्य रस्ता झाला जलमय, वाहतूक विस्कळीत
दिंडोरी : दिंडोरी शहरासह तालुक्यात शनिवार रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून सर्व नदी, नाल्यांना पूर आला आहे. सर्व धरणांच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान रविवार सकाळी आठपासून पुन्हा जोरदार पाऊस होत अवघ्या सात तासात दिंडोरी शहरात विक्रमी ११० मिमी पाऊस झाला असून सारा तालुका जलमय झाला आहे.
शनिवार रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून रविवारी सकाळपासून पुन्हा तुफान पाऊस सुरू असून सर्व नदी, नाले यांना पूर आला असून सर्व धरणांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे. दिंडोरी शहरातून जाणाऱ्या धामण नदीला मोठा पूर आला. हनुमान मंदिरापर्यंत पाणी पोहोचले. काही दुकाने, घरांमध्ये पाणी शिरले.
दुपारी नाशिक कळवण रस्त्यावर रणतळे परिसरात तुफान पाऊस झाल्याने रणतळे येथे पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर पाणी येत या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली, तर वलखेड ननाशी बाऱ्हे रस्त्यावर चारोसाजवळ कादवा नदीला तर घाटाळबारी येथे पार नदीला मोठा पूर येत पुलावरून पाणी वाहत असल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. तसेच पश्चिम भागात अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
येवला मनमाड येथील पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने शुक्रवारपासून वाघाड व करंजवण धरणातून पालखेड धरणात पाणी सोडले होते; मात्र पालखेडच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असून सर्व नदी-नाले यांना पूर आला होता पूर पाण्यात येवला साठी पाणी पुरणार असून प्रशासनाने वाघाड व करंजवणचा विसर्ग थांबविण्यात आला.
वाघाड करंजवणमधून पालखेड मध्ये आवर्तन सोडल्याने कादवा कोलवन नदीकाठच्या गावांचा पाणी चोरी होऊ नये म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
(वार्ताहर)