दिंडोरीत महिलाही उतरल्या रस्त्यावर
By admin | Published: June 4, 2017 01:42 AM2017-06-04T01:42:48+5:302017-06-04T01:42:57+5:30
दिंडोरी तालुक्यातील शेतकरी महिलांनी सकाळी ९ वाजता नाशिक गुजरात राज्य मार्ग पालखेड चौफुली येथे रोखला
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : सरकारने सरसकट कर्जमाफी न देता अल्प भूधारक व मोठे शेतकरी यांच्यात फूट पाडून शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी रात्री उशिरा काही शेतकरी संघटनांना हाताशी धरून जो निर्णय घेतला त्याचा निषेध करत दिंडोरी तालुक्यातील शेतकरी महिलांनी सकाळी ९ वाजता नाशिक गुजरात राज्य मार्ग पालखेड चौफुली येथे रोखला. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी पालखेड चौफुली येथे आंबे, टमाटा ओतून सरकारचा निषेध केला. यावेळी साक्षी राजे यांनी सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे, असे सांगितले. संगीता सातपुते यांनी सरकार वेळ काढूपणा करत असून, फक्त आश्वासनांचे गाजर दाखवत आहे. शेतकरी अशा फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही, असे सांगितले. यावेळी अनेक माहिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ज्योती देशमुख, चारुशीला राजे, नगरसेविका मालती जाधव, सविता देशमुख, क्षितिजा राजे, साक्षी राजे, संगीता देशमुख, पुष्पा देशमुख, माया कुलकर्णी, मीरा जाधव, जयश्री सातपुते आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना आसमानी व सुलतानी संकटाना सामोरे जावे लागले त्यामुळे त्याने काढलेल्या कर्जात वाढ
झाली, एकाही भाजीपाला पिकाला भाव मिळाला नाही. त्यामुळे
आज शेतकऱ्यांच्या मुलींनाही आत्महत्या करण्याची वेळ आली
आहे. जर सरसकट कर्जमाफी दिली नाही तर आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू, असा निर्धार लता बोरस्ते यांनी व्यक्त केला.प्रथमच महिला रस्त्यावर
दिंडोरीत आज ऐतिहासिक घटना घडली. राजकीय पक्षाच्या आंदोलनात दोन चार महिला उपस्थित राहतात, मात्र आज सकाळी ८ वाजेपासूनच येथील महिलांनी चूल, मूल बाजूला ठेवत आंदोलन केले. आंदोलनात तीनशे ते चारशे महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या होत्या.दिंडोरीत वाहतूक ठप्प
पालखेड चौफुलीवर महिलांनी आंदोलन सुरु केल्याने नाशिक, कळवण, वणी, सापुतारा, सुरत येथे
ये-जा करणाऱ्या वाहतुकीवर झाला. सुमारे एक तास आंदोलन सुरु असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पालखेड चौफुलीवर लाल चिखल : संतप्त महिलांनी पालखेड चौफुलीवर आंबे व टमाटा फेकल्यामुळे रस्त्यावर लाल चिखल निर्माण झाला होता. त्यामुळे दुचाकीचालकांची वाहने घसरत होती. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यांची सफाई केली.