दिंडोरीकरांना कोविड रुग्णालयाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 06:46 PM2021-04-10T18:46:07+5:302021-04-10T18:46:35+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाचे बस्तान मोठ्या प्रमाणावर असल्याने व विशेष असे कोविड रुग्णालय तालुक्यात उपलब्ध नसल्याने दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाचे बस्तान मोठ्या प्रमाणावर असल्याने व विशेष असे कोविड रुग्णालय तालुक्यात उपलब्ध नसल्याने दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे.
सध्या दिंडोरी तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने त्यांचा परिणाम जनतेवर होत आहे. काही ठिकाणी मिनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे दिलासा मिळत आहे. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता व रग्णांची संख्या लक्षात घेता दिंडोरीकरांना विशेष असे कोविड रुग्णालय नसल्याने जनतेमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील पेशंट रुग्णालयात जाण्यासाठी टाळाटाळ करताना दिसत आहेत. त्याचे मुख्य कारण रुग्णालयात गेले तर कुठलीही सोय मिळत नाही. त्यामुळे घरी राहून योग्य उपचार घेतलेले बरे असे येथील लोकांचे मत असल्यामुळे विविध ठिकाणी अनेक रुग्ण होम क्वॉरंटाइनला पसंती देत आहेत.
मिनी लॉकडाऊनचा प्रभाव
सध्या शासनाने मिनी लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केल्याने त्याचा प्रभाव दिंडोरी तालुक्यातील विविध भागात पहायला मिळत आहे. जनतेने जर असाच प्रतिसाद दाखविला तर कोरोनावर सहज मात करता येईल, असे विचार ग्रामीण भागातून ऐकायला मिळत आहे. जनतेने आता सावध होऊन व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून आपण व आपले कुटुंब कोरोनापासून सुरक्षित राहील. असे दिंडोरी तालुका आरोग्य अधिकारी सुजित कोशिरे यांनी सांगितले.
दिंडोरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासन याकामी भरपूर प्रयत्नशील आहे. परंतु सध्या ग्रामीण भागातील रुग्णांना काही ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. या गोष्टी घडू नये यासाठी शासनाने ठोस भूमिका घेऊन तालुक्याच्या ठिकाणी सर्व सुविधा असणारे कोविड रुग्णालय स्थापन करावे.
- योगेश बर्डे, उपसरपंच, म्हेळुस्के, ता. दिंडोरी.