बोटक्लबवर होणार डोहाळे जेवण
By admin | Published: March 3, 2017 01:51 AM2017-03-03T01:51:25+5:302017-03-03T01:51:40+5:30
नाशिक : बोटक्लबकडे शासन व्यवस्थेचे झालेले दुर्लक्ष पाहता,दुरुस्तीसाठी आर्थिक हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बोटक्लब सार्वजनिक समारंभासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधी रुपये खर्च करून गंगापूर धरणालगत उभारण्यात येणाऱ्या बोटक्लबकडे राज्यातील सत्तांतरानंतर शासन व्यवस्थेचे झालेले दुर्लक्ष पाहता, सद्यस्थितीत बोटक्लबवर उभारण्यात आलेल्या सुविधांकडे पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच तेथील व्यवस्थेची देखभाल, दुरुस्तीसाठी आर्थिक हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बोटक्लब सार्वजनिक समारंभासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नवीन निर्णयामुळे गंगापूर धरणालगतच्या नयनरम्य वातावरणात वाढदिवस साजरा होण्याबरोबरच लग्नसमारंभ, डोहाळे जेवणाच्या पंक्तीही उठणार असून, त्यासाठी मात्र तासावर पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या गंगापूर धरणावर उभारण्यात येणारे व अर्धवटस्थितीत पडून असलेल्या बोटक्लबची अवस्था बिकट आहे.
या ठिकाणी उभारण्यात आलेले प्रदर्शनीय सेंटर अर्धवट असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून उभारण्यात येणाऱ्या रिसॉर्टचे कामही काही कोणत्या तरी निमित्ताने पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे पर्यटनवृद्धीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही पाहिजे त्या प्रमाणात त्याचा उपयोग होत नाही, उलटपक्षी पर्यटन महामंडळाने विकसित केलेले व त्यांच्या ताब्यात असलेल्या वास्तुची देखभाल दुरुस्ती करण्यासाठीच महामंडळाला खर्च करावा लागत आहे. अशा परिस्थितीत या वास्तुचे जतन तर व्हावेच, परंतु नाशिक हे पर्यटकांना आकर्षित करण्यात यशस्वी व्हावे, असा विचार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
काही वर्षांपूर्वी आघाडीचा अभिनेता सलमान खान याने हजेरी लावलेल्या बोटक्लबला पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी करावयाच्या प्रयत्नाचा भाग म्हणून आता नाशिककरांसोबतच राज्यातील कानाकोपऱ्यातील कोणत्याही पर्यटकांना समारंभाच्या माध्यमातून बोटक्लबचा आनंद घेता यावा म्हणून वाढदिवस, लग्न समारंभ, डोहाळे जेवण, साखरपुडा अशा आनंद व मांगल्यमय समारंभासाठी भाड्याने देण्याचे ठरविले आहे.
सकाळी १० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पर्यटन विकास महामंडळाच्या अटी, शर्तींच्या अधीन राहून भाडेतत्त्वावर बोटक्लबचा वापर व तेथील सोयी, सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. त्यासाठी चार तासांसाठी पाच हजार रुपये, आठ तासांसाठी सात हजार व पूर्ण दिवसासाठी दहा हजार रुपये दर आकारणी असेल. याशिवाय बोटक्लबची स्वच्छता, वीज वापर व सेवाकरासाठी दोन हजार रुपये अतिरिक्तआकारणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)