लोकाभिमुख प्रशासनासाठी प्रयत्नशील दीपेंद्रसिंग कुशवाह : कामकाजाला सुरुवात
By Admin | Published: February 11, 2015 12:45 AM2015-02-11T00:45:16+5:302015-02-11T00:45:50+5:30
लोकाभिमुख प्रशासनासाठी प्रयत्नशील दीपेंद्रसिंग कुशवाह : कामकाजाला सुरुवात
नाशिक : लोकाभिमुख प्रशासन व पारदर्शी कारभाराला आपले प्राधान्य राहील, मात्र चुकीचे कामकाज करणाऱ्याची गय केली जाणार नाही, अशा शब्दात नूतन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या आगामी कार्यपद्धतीचे संकेत दिले. सिंहस्थ कुंभमेळ्याविषयी कामकाजाचा आढावा घेतला असून, मुदतीत कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे, अशी कबुलीही त्यांनी दिली. कुशवाह यांनी सोमवारीच मंत्रालयात मावळते जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची आढावा बैठक घेऊन जाणून घेतले व दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे आगमन झाले. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत झालेल्या कुंभमेळ्याच्या साप्ताहिक आढावा बैठकीत त्यांनी कुंभमेळा आराखड्याची माहिती करून घेतली. पत्रकारांशी बोलताना कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकची जगभरात ओळख होणार असल्याने तो यशस्वी करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार असून, सध्या सुरू असलेली कामे प्रगतिपथावर असल्याने ती मुदतीत पूर्ण करण्यात येतील. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आपल्याला चांगल्या कामाची अपेक्षा असून, अशांच्या पाठीशी आपण कायम राहू, परंतु चुकणाऱ्यांची गय केली जाणार नाही. गतिमान प्रशासन यशस्वीतेसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांना ताटकळत ठेवू नये, अशी अपेक्षाही कुशवाह यांनी व्यक्त केली.