दहावीनंतर डिप्लोमा प्रवेशप्रक्रियेस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:00+5:302021-07-02T04:11:00+5:30
नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या दहावीनंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया बुधवारपासून (दि.३०) ...
नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या दहावीनंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया बुधवारपासून (दि.३०) सुरू झाली असून, शासकीय तंत्रनिकेतन नाशिकसह जिल्ह्यातील २५ महाविद्यालयांतील विविध सुविधा व मार्गदर्शन केंद्राचीही सुरुवात झाली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना त्यांना अर्ज व कागदपत्र अपलोड करण्यासाठी व पडताळणीसाठी ‘ई-स्क्रूटनी’ आणि ‘प्रत्यक्ष स्क्रूटनी’चा पर्याय उपलब्ध असून, विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार पर्याय निवडू शकणार आहेत.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या सुविधा व मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून मोफत नोंदणी अर्ज व कागदपत्र अपलोड करता येणार आहे. नाशिक शासकीय तंत्रनिकेतन येथे प्राचार्य ज्ञानदेव नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सुविधा व मार्गदर्शन केंद्राची सुरुवात करण्यात आली असून, या केंद्राचे कामकाज बुधवारी (दि. ३०) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती केंद्र समन्वयक डॉ. सचिन पाबळे यांनी दिली. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून संस्थेत मॅट्रिक्यूनिक्स व पॉलिमर अभियांत्रिकी असे दोन नवीन पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू होत असून, नाशिक विभागातील पात्र विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे.
इन्फो-१
ई-स्क्रूटनीचा पर्याय
डिप्लोमा प्रवेशासाठी उमेदवार ऑनलाइन नोंदणी करून ई-स्क्रूटनी पद्धतीचा पर्याय निवडू शकतील, या पद्धतीमध्ये उमेदवार कोणत्याही ठिकाणावरून इंटरनेटशी जोडलेल्या संगणक अथवा स्मार्टफोनद्वारे ऑनलाइन अर्ज भरून सबमिट करू शकतील. आवश्यक कागदपत्रही अपलोड करता येणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराला अर्जाच्या पडताळणीसाठी व निश्चितीसाठी प्रत्यक्ष जाण्याची जाण्याची गरज भासणार नाही. उमेवाराचा अर्ज व कागदपत्र सुविधा केंद्राद्वारे पडताळून निश्चित केले जातील.
इन्फो-२
‘प्रत्यक्ष स्क्रूटनीचा पर्याय’
उमेदवार स्मार्टफोनवरून अथवा संगणकावरून ऑनलाइन नोंदणी करून ‘प्रत्यक्ष स्कूटनी’ पद्धतीचा पर्याय निवडू शकतील. सुविधा उपलब्ध नसलेले विद्यार्थी त्यांच्या जवळील सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी व सोईस्कर वेळ ठरविण्यासाठी जाऊ शकतील. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेसाठी सोईस्कर सुविधा केंद्राची तारीख व वेळ ठरवून घेता येणार आहे. उमेदवार ऑनलाइन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करणे आदी प्रक्रिया सुविधा केंद्रावर विनानिशुल्क करता येणार आहे. त्यासाठी त्यांनी नेमून दिलेल्या वेळेत सुविधा केंद्रावर उपस्थित राहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करून अर्ज पडताळणी व निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना तंत्रशिक्षण मंडळाने केल्या आहेत.
--
इन्फो-
मागील वर्षी ५६ टक्के प्रवेश
जिल्ह्यातील महाविद्यालये- २५
उपलब्ध जागा- ९२५४
गत वर्षातील प्रवेश- ५१७८
गतवर्षीच्या रिक्त जागा- ४०७६