पिंपळगावच्या अमरधाममध्ये दीपोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 10:06 PM2021-11-04T22:06:44+5:302021-11-04T22:09:48+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील वन्यजीव रक्षक आणि पत्रकार संघाच्यावतीने अमरधाम अर्थात स्मशानभूमीत दीपावली निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
पिंपळगाव बसवंत : येथील वन्यजीव रक्षक आणि पत्रकार संघाच्यावतीने अमरधाम अर्थात स्मशानभूमीत दीपावली निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
स्मशानभूमी म्हटली की तिथे असतो दुःखाचा आक्रोश, शांतता, स्तब्धता. ही मानवाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची जागा असूनही ती उपेक्षितच असते. कारण सुख आणि आनंद हा उत्सव तिथे नसतोच , असतो तो फक्त जीवन समाप्तीचा दुःखावेग.. !
मृत व्यक्तीचा अंत्यविधी कधी होतो आणि बाहेर पडतो असे येथे येणाऱ्यांना वाटते. त्यामुळे साऱ्या गावाची ही वास्तू जिथे राजा आणि रंक या दोहोंचा अंतिम प्रवास सारखाच असतो तिथे इतरवेळी कोणी फिरकत नाही. त्यामुळे स्वच्छता, दिवाबत्ती, उत्सव ही तर केवळ कल्पनाच पण ही कल्पना पिंपळगाव येथील ध्येयवेड्या तरुणांनी सत्यात उतरवली आहे.
पिंपळगाव येथील वन्यजीव रक्षक आणि पत्रकार संघाच्यावतीने स्मशानभूमीत दिवाळी साजरी करण्यात आली आहे. यावेळी पिंटू पवार, गणेश शेवरे, स्वप्निल देवरे, विक्रम गिते, श्रावण मोरे, संतोष खरात, योगेश डिंगोरे, संतोष आंबेकर, निलेश कायसते आदी सहभागी झाले होते. या सोहळ्यात महिलांचाही लक्षवेधी सहभाग होता.
आपण सर्व सण, उत्सव साजरे करतो. पण स्मशानभूमीकडे कधीही लक्ष देत नाही. या ठिकाणी प्रत्येकाला एक दिवस यायचे असते. इथेही दीपावली निमित्त प्रकाशपर्व साजरे केले पाहिजे. म्हणून हा अल्पसा प्रयत्न केला.
- राजेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते
गेल्या अनेक पिढ्यांपासून आमचे कुटुंब या स्मशानभूमीत काम करते. पण अशाप्रकारे कोणीही दिवाळी निमित्त रोषणाई करून सण साजरा केला नाही
- पंकज झरावत, कामगार, अमरधाम