रिपाइंकडून थेट उमेदवारी; नो मुलाखती
By admin | Published: February 2, 2017 01:07 AM2017-02-02T01:07:43+5:302017-02-02T01:07:59+5:30
रिपाइंकडून थेट उमेदवारी; नो मुलाखती
नाशिक : भाजपासोबत असलेल्या रिपाइं आठवले गटाने भाजपाकडे २० ते २२ जागांची मागणी केली असली तरी भाजपाकडून मिळणाऱ्या जागांवर रिपाइंकडून उमेदवारांची निश्चित संख्या ठरणार आहे. रिपाइंने निवडून येणाऱ्या जागांची चाचपणी करूनच भाजपाकडे जागा मागितल्या असून, उमेदवारांच्या मुलाखतीचा फार्स न ठेवता निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच थेट उमेदवारी दिली जाणार आहे.
रिपाइंकडून जागांची चाचपणी केल्यानंतर शहरातील काही जागांविषयी अंतिम बोलणी झाली आहे. मात्र याबाबतची स्पष्ट घोषणा झाली नसली तरी समझोता नक्की झाल्याचे रिपाइंच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे शहरात निवडणुकीची तयारी करण्यात आलेली आहे. मात्र नाशिकरोडच्या काही जागांवर अद्याप तिढा कायम असल्याने भाजपाकडून जागांची निश्चिती झाल्यानंतर त्याबाबतचा फैसला पक्षाध्यक्ष रामदास आठवले करतील, असे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी सांगितले.
इतर राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असताना रिपाइंने मात्र उमेदवारांच्या मुलाखती न घेता त्यांच्या कामकाजाच्या जोरावर संबंधितांना उमेदवारी दिली जाणार आहे. पक्षाकडेदेखील इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र कुणालाही शब्द देण्यात आलेला नाही. त्यामुळे ऐनवेळी नाराजीचा फटका रिपाइंला बसणार नाही, असा कयास पक्षाने बांधला आहे. (प्रतिनिधी)