थेट जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:08 AM2019-12-22T01:08:57+5:302019-12-22T01:09:21+5:30
गंगापूर धरणातून थेट नाशिकरोड व गांधीनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी शनिवारी सकाळी गंगापूर गावानजीकच्या कानेटकर उद्यानाजवळ एका अज्ञात जेसीबीचालकाने तोडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.
गंगापूर : गंगापूर धरणातून थेट नाशिकरोड व गांधीनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी शनिवारी सकाळी गंगापूर गावानजीकच्या कानेटकर उद्यानाजवळ एका अज्ञात जेसीबीचालकाने तोडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. शिवाय शहरातील पंचवटीसह काही भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला. सदरची मुख्य जलवाहिनी असल्यामुळे सुमारे ५० फुटाहून उंच पाण्याचा फवारा उडून पाण्याचा अपव्यय झाला. महापालिकेला याची माहिती मिळाल्यावर अधिकाऱ्यांनी तत्काळ मुख्य पाण्याचा विसर्ग थांबवून दुरुस्तीचे काम हाती घेतले.
सुला वाइन आणि कानेटकर उद्यानाकडे जाणाºया रस्त्यावरील पाटामधून गेलेल्या एक मीटर व्यासाच्या मुख्य लाइनमधील व्हॉल्व्ह शनिवारी सकाळी अज्ञात जेसीबीचालकाने तोडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाखो लिटर पाणी वाया गेले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी या ठिकाणी परिसरात बांधकामाचे काम करण्यासाठी आलेल्या जेसीबीच्या चालकाने मुद्दामहून या मुख्य जलवाहिनीला जेसीबीच्या धडकेने व्हॉल्व्ह तोडला. त्यानंतर तत्काळ त्याने तेथून पळ काढला. मुख्य जलवाहिनी असल्याकारणाने आकाशात उंच पाण्याचा फवारा उडू लागल्याचे पाहून नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले. या घटनेची माहिती महापालिकेला कळविण्यात आल्यावर महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंत्याने धाव घेतली. थेट गंगापूर धरणातून जलवाहिनीला पाणीपुरवठा होत असल्याने गंगापूर धरणातूनच पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आल्यावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार पाण्याच्या प्रेशरने फुटला असावा. मुख्य जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळजोडणी घेऊन पाण्याची चोरी केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते. परंतु त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. त्यामुळे सदरचे बांधकाम नक्की कोणाचे आणि त्याकडे दुर्लक्ष का केले गेले असा प्रश्न केला जात आहे.
सकाळी या ठिकाणाहून जात असताना एक जेसीबी मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हजवळ उभा होता. थोड्या वेळात व्हॉल्व्ह तुटल्याचा जोरदार आवाज झाला व पाण्याचा उंच फवारा उडाला. त्यामुळे जेसीबीचालकाने घाबरून तेथून पळ काढला.
- चंद्रकांत राऊत, प्रत्यक्षदर्शी
एक मीटर व्यासाची पाण्याची जलवाहिनी असल्याने यामध्ये पाण्याचा मोठा प्रेशर तयार होतो. व्हॉल्व्हमधून हवा पास होत नसल्याने तो तुटला आहे. या जलवाहिनीतून नाशिकरोड आणि उपनगर विभागाला थेट पाणीपुरवठा करते. त्यामुळे प्रेशर वाढल्याने कदाचित व्हॉल्व्ह तुटला असावा.
शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, मनपा