नेपथ्यकार, कलादिग्दर्शक अरुण रहाणे यांचे निधन
By admin | Published: June 21, 2017 12:11 AM2017-06-21T00:11:30+5:302017-06-21T00:11:56+5:30
साईन बोर्ड पेंटरपासून नाटकांचा नेपथ्यकार ते चित्रपट कलादिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : साईन बोर्ड पेंटरपासून नाटकांचा नेपथ्यकार ते चित्रपट कलादिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास करत यशोकीर्ती मिळविणारे अरुण रहाणे यांचे मंगळवारी (दि. २०) सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या अचानक एक्झिटमुळे कलाक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. दुपारी नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रहाणे यांच्या पश्चात पत्नी शकुंतला, दोन मुले प्रसाद व राहुल, सून असा परिवार आहे. अरुण रहाणे यांच्या निधनाचे वृत्त येताच साहित्य व कलाक्षेत्रात शोककळा पसरली. मूळचे नगर जिल्ह्णातील पुणतांबा या गावचे रहिवासी असलेले अरुण रहाणे यांचे प्राथमिक शिक्षण पुणतांबा येथेच झाले. त्यानंतर नगरला त्यांनी प्रगतकला चित्रकला महाविद्यालयात पुढील शिक्षण पूर्ण केले. लहाणपणीच पितृछत्र हरपलेल्या रहाणे यांनी १९८० मध्ये नाशिक गाठले आणि उपजतच चित्रकलेची ओढ असलेल्या रहाणे यांनी नाशकात साईन बोर्ड पेटिंगची कामे सुरू केली. साईन बोर्ड पेटिंगची कामे करत असतानाच त्यांना एकांकिका, राज्य नाट्य स्पर्धा यामध्ये नेपथ्याची कामे मिळत गेली. नाशिकमध्ये ‘तेजस्विनी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना त्यात त्यांनी छोटीशी भूमिकाही साकारली होती. सुमारे २५ हून अधिक नाटकांची नेपथ्यरचना करणाऱ्या रहाणे यांनी पुढे मराठी चित्रपटांमध्ये कलादिग्दर्शकाची भूमिका यशस्वीपणे निभावत सुमारे साठहून अधिक चित्रपटांचे सेट डिझाइन केले. त्यात प्रामुख्याने सावरखेड एक गाव, जत्रा, कवडसा, बकुळा नामदेव घोटाळे, तोचि एक समर्थ, ब्लाइंड गेम, निशाणी डावा अंगठा, सनई चौघडे, राजमाता जिजाऊ, पहिली शेर, दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर आदी चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी तीन हिंदी चित्रपटांचेही कलादिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ‘जत्रा’ चित्रपटातील गाजलेल्या ‘कोंबडी पळाली’ या गीताचे सेट डिझाइन रहाणे यांनीच साकारले होते. कलादिग्दर्शनात त्यांनी सामाजिक, कौटुंबिक, विनोदी, रहस्यमय, ऐतिहासिक असे अनेकविध विषय हाताळले. अनेक नामवंत कलादिग्दर्शकांसमवेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नाशिक विभागीय शाखेचे कोषाध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. उत्कृष्ट कलादिग्दर्शकाचा पुरस्कार
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या गोदावरी गौरव व जनस्थान पुरस्कारांचीही नेपथ्यरचना त्यांचीच असायची. कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या काही चित्रपटांना नामांकने मिळाली होती तर ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट कलादिग्दर्शकाचा पुरस्कार लाभला होता. याशिवाय, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनेही त्यांना गौरविले होते. दुपारी नाशिक अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याप्रसंगी साहित्य, कला, नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलावंत, मान्यवर उपस्थित होते.