बंडखोरांना थेट मातोश्रीवर पाचारण
By admin | Published: February 10, 2017 10:54 PM2017-02-10T22:54:00+5:302017-02-10T22:54:10+5:30
एकलहऱ्याला बंडखोरी कायम?
नाशिक : नाशिक तालुक्यातील एकलहरे गटातून निष्ठावतांना डावलण्यात आल्याने बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेने डॅमेज कंट्रोल सुरू केले असून, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांना शनिवारी (दि. ११) मुंबईला मातोश्रीवर बोलविण्यात आल्याची चर्चा आहे.
एकलहरे गटातून खासदारपुत्र अजिंंक्य हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले एकलहऱ्याचे सरपंच शंकर धनवटे यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली होती. शंकर धनवटे यांना उमेदवारी न दिल्याने एकलहरे गावातून शिवसेनेविरोधात बंद पाळण्यात आला होता. पळसे गटातूनही माजी सदस्य संजय तुंगार व पंचायत समिती उपसभापती अनिल ढिकले यांना डावलून उपजिल्हाप्रमुख जगन आगळे यांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या तुंगार व ढिकले यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी चालविली होती. अखेर जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी नाराजांना चुचकारत संजय तुंगार यांच्या पत्नी सविता तुंगार यांना पळसे गणातून शिवसेना पुरस्कृत करण्याचा शब्द देण्यासह अनिल ढिकले यांना जगन आगळे यांचे उपजिल्हाप्रमुखपद देण्याची तयारी दर्शविल्याने दोघांनीही बंडखोरी मागे घेतली. मात्र एकलहरे गटातील शिवसेनेकडून इच्छुक असलेले उमेदवार शंकर धनवटे व एकलहरे गणातून अपक्ष ठरविण्यात आलेले शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांनी बाळासाहेब ठाकरे एकनिष्ठ आघाडी स्थापन करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दाखविल्याने गडबडलेल्या शिवसेना नेत्यांनी धनवटे व म्हस्के यांना गोंजरण्यास सुरुवात केल्याचे समजते. त्यातच तोडगा निघत नसल्याने अखेर मातोश्रीपर्यंत हे प्रकरण गेल्याची चर्चा आहे. तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के यांना शनिवारी (दि. ११) मातोश्रीवर चर्चेसाठी बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मातोश्रीवर काय निर्णय होतो, यावरच आता एकलहरे गट व एकलहरे गणातील बंडखोरांचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)