सकाळे यांच्याविरुद्ध संचालक एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:59 AM2020-08-21T00:59:47+5:302020-08-21T01:02:19+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अंतर्गत राजकारण चांगलेच रंगले असून, सभापती बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातूनच माजी सभापती देवीदास पिंगळे गटातील संचालकांनी विद्यमान सभापती संपत सकाळे हे बाजार समितीचे ठराव मोडीत काढून त्याविरोधात निर्णय घेत असल्याचा ठपका ठेवून सकाळे यांचे सह्यांचे अधिकार काढावे यासाठी गुरुवारी दुपारी बाजार समिती सचिव अरुण काळे यांना लेखी पत्र दिले असल्याचे समजते.
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अंतर्गत राजकारण चांगलेच रंगले असून, सभापती बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातूनच माजी सभापती देवीदास पिंगळे गटातील संचालकांनी विद्यमान सभापती संपत सकाळे हे बाजार समितीचे ठराव मोडीत काढून त्याविरोधात निर्णय घेत असल्याचा ठपका ठेवून सकाळे यांचे सह्यांचे अधिकार काढावे यासाठी गुरुवारी दुपारी बाजार समिती सचिव अरुण काळे यांना लेखी पत्र दिले असल्याचे समजते. सदर पत्रावर १४ संचालकांच्या स्वाक्षरी असल्याचे एका संचालकांने सांगितले.
दरम्यान, उद्या शुक्रवारी बाजार समिती संचालक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सकाळे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याची शक्यता आहे. माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या पाठोपाठ आता सकाळे याच्यावरदेखील अविश्वास ठराव दाखल करण्याची तयारी पिंगळे गटातील संचालकांनी केल्याने अंतर्गत राजकारण पेटू लागले आहे.सकाळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर तसेच त्यांचे सह्णांचे अधिकार काढल्यानंतर अन्य कोणा संचालकाकडे सह्यांचे अधिकार जाण्याची शक्यता आहे. त्यातच सकाळे हेदेखील राजीनामा देण्याच्या तयारीत असून त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला तर सभापतिपदी पुन्हा पिंगळे होणार असल्याचे काही संचालकांनी बोलून दाखविले.