मालेगावी मोसम नदीपात्रात घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 10:27 PM2020-01-24T22:27:02+5:302020-01-25T00:33:58+5:30
मालेगाव शहरातील बाजार परिसरातील मांस, मत्स व इतर व्यावसायिकांकडून कचराकुंडी म्हणून घाणकचरा टाकण्यासाठी मोसम नदीपात्राचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
मालेगाव मध्य : शहरातील बाजार परिसरातील मांस, मत्स व इतर व्यावसायिकांकडून कचराकुंडी म्हणून घाणकचरा टाकण्यासाठी मोसम नदीपात्राचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
वेळोवेळी तक्रार करूनही मनपाकडून स्वच्छता होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाच्या स्वच्छता विभागाने नदीपात्राची स्वच्छता करीत टाकाऊ पदार्थ टाकणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरातून गेलेल्या मोसम नदी एकेकाळी मोक्षगंगा म्हणून ओळखली जात होती. तथापि मागील अनेक वर्षांपासून पर्जन्यवृष्टीचा अनियमिततेमुळे नदी आगामी पावसाळ्याचा अपवादवगळता नदीपात्र कोरडे पडलेले असते. शहराच्या प्रवेशद्वारापासून ते म्हाळदे शिवारातील कचरा डेपोपर्यंत शहरातील गटारीचे दूषित पाणी ठिकठिकाणी नदीपात्रात सोडण्यात येते. त्यामुळे गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच सांडवापूल ते रामसेतूदरम्यान असलेल्या बाजारातील मासे, कोंबडीचे काही व्यावसायिकांकडून टाकाऊ पदार्थ टाकण्यासाठी नदीपात्राचा सर्रास वापर केला जात आहे. इतर व्यावसायिकांकडूनही घाणकचरा टाकण्यात येतो. सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून मनपाकडे अनेकवेळी तक्रारी करण्यात येते मात्र मनपा प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे घाणकचरा व टाकाऊ पदार्थ कुजून परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने जातीने लक्ष देत नदीपात्राची स्वच्छता करून नदीपात्रात घाणकचरा व टाकाऊ पदार्थ टाकणाºया व्यवसायिकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांसह रहिवाशांकडून करण्यात येत आहे. आज दुपारी रामसेतूलगतच्या नदीपात्राची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
उद्या तातडीने रामसेतू येथील स्वच्छता करण्यात येई. मच्छीबाजारातील व्यावसायिकांसाठी स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. यापुढे नदीपात्रात टाकाऊ पदार्थ व घाणकचरा टाकू नये म्हणून समज देण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारे नदी प्रदूषण करणाºयांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल.
- अनिल पारखे, स्वच्छता निरीक्षक, मनपा
परिसरातील व्यावसायिकांकडून नदीपात्राचा कचराकुंडी म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वेळोवेळी मनपाकडे तक्रारी करीत मनपाचे लक्ष वेधण्यात येते. मात्र मनपा प्रशासनाकडून सदर समस्येकडे दुर्लक्ष केले जाते.
- रामदास बोरसे, अध्यक्ष, नागरी सुविधा सेवा समिती