उड्डाणपुलावरून बस जात असल्याने गैरसोय
By admin | Published: March 14, 2016 11:27 PM2016-03-14T23:27:50+5:302016-03-15T00:10:41+5:30
दोडी : प्रवाशांचे आगारप्रमुखांना निवेदन; रविवारी रास्ता रोको
नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे महामार्गावर दोडी गावालगत बांधण्यात आलेला उड्डाणपूल सुरू झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस उड्डाणपुलावरून निघून जात आहेत. त्यामुळे दोडी येथे अधिकृत थांबा असूनही उपयोग होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. बसने उड्डाणपुलाहून प्रवास न करता सर्व्हिस रस्त्याने जात प्रवासांची अडचण दूर करावी, अशी मागणी केली आहे.
सिन्नर-संगमनेर तालुक्यादरम्यान नाशिक-पुणे महामार्गावर दोडी बुद्रूक हे महत्त्वपूर्ण गाव आहे. या
ठिकाणी अनेक शैक्षणिक संस्था, कृषी बाजार समितीचे उपबाजार आवार, ग्रामीण रुग्णालय, बॅँका आदिंसह महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत.
त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गेल्या महिन्यात नाशिक-पुणे महामार्गावर दोडी गावाजवळ बांधण्यात आलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात
आला आहे. त्यामुळे खासगी वाहनासह राज्य परिवहन महामंडळाच्या बस या
उड्डाणपुलावरून प्रवास करू लागल्या आहेत. त्यामुळे दोडीच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
दोडी बुद्रूक येथे सर्व आगाराच्या बसेसला अधिकृत थांबा
आहे. तथापि, अनेक बस थांबत नाहीत. त्यामुळे सिन्नर किंवा संगमनेरकडे जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार
घ्यावा लागत आहे. बसने उड्डाणपुलावरून न जाता सर्व्हिस रस्त्याने जात दोडी येथील प्रवाशांची चढ-उतार करावी अशी मागणी सिन्नर आगारप्रमुखांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
सिन्नर व संगमनेर बसस्थानकातूनच दोडीचे प्रवास घेण्यास वाहकांकडून नकार दिला जात असल्याचे प्रकार घडत आहे. प्रवासी घेतलेच तर त्यांना अर्धा किलोमीटर अंतर मागे उड्डाणपुलाच्या पायथ्याशी सोडून दिले जात असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.
दोडी येथे वाहतूक नियंत्रणकाची नेमणूक करून जे बसचालक परस्पर उड्डाणपुलाहून निघून जातील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्व वाहनचालकांना दोडी येथे बस थांबविण्याच्या सूचना करण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे. यापूर्वीही दोन वेळा निवेदन देऊन उपयोग झाला नसल्याने यापुढे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी सदर मागण्यांचे निवेदन परिवहनमंत्री, राज्य परिवहन महामंडळाचे कार्यकारी संचालक, नाशिक व पुणे येथील प्रादेशिक व्यवस्थापक, तहसीलदार, पोलीस ठाणे यांच्यासह सिन्नर व संगमनेर येथील आगार व्यवस्थापकांना दिले आहे. (वार्ताहर)