वाहन नोंदणी कॅँप स्थलांतरामुळे गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:23 AM2018-03-30T00:23:44+5:302018-03-30T00:23:44+5:30
सटाणा : गेल्या तीन ते चार दशकांपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे येथील ताहाराबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह आवारात वाहन नोंदणी कॅम्प घेतला जात होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या कॅम्पचे स्थलांतर करून शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिक रस्त्यावरील चिनार या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात भरविला जात आहे.
यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून, हा वाहन नोंदणी कॅम्प पूर्वीच्याच ठिकाणी घेण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना साकडे घातले. राजेंद्र सोनवणे यांनी विभागाचे मोटार वाहन निरीक्षक जमीर तडवी व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सौ.एम.एम. चौधरी यांना येथील चिनार विश्रामगृहावर साकडे घालून आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. अशा परिस्थितीत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर वाहन नोंदणीसाठी भर उन्हात उभे राहवे लागत आहे. यामुळे वाहनधारकांची हेळसांड होत असल्याचे निवेदनात नमूद करून वाहन नोंदणी कॅम्प पूर्वीच्याच जागी घेण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात वाहन नोंदणी कॅम्पचे आयोजन केले जात होते. मात्र जागा अपुरी पडत असल्याचे कारण दाखवित या कॅम्पचे स्थलांतर शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील नाशिक रस्त्यावरील चिनार विश्रामगृहजवळ केले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातून वाहन नोंदणीसाठी येणाºया नागरिकांना शहराबाहेर जाण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. याशिवाय येथे पिण्याच्या पाण्याचीदेखील सुविधा नसल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.