निफाड ते सिन्नर प्रवाशांची गैरसोय

By Admin | Published: February 18, 2016 10:45 PM2016-02-18T22:45:19+5:302016-02-18T22:46:58+5:30

चक्री बस : पुण्याकडे जाण्यासाठी नाशिकमार्गे प्रवास

Disadvantage of Niphad to Sinnar Passengers | निफाड ते सिन्नर प्रवाशांची गैरसोय

निफाड ते सिन्नर प्रवाशांची गैरसोय

googlenewsNext

 निफाड : येथून सिन्नर येथे ये-जा करण्यासाठी पुरेशा बसेस नसल्याने दोन्ही तालुक्यांतील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. लासलगाव डेपो मॅनेजर यांनी याप्रश्नी लक्ष घालून निफाड ते सिन्नर अशी चक्री बस सुरू करण्याची मागणी निफाडच्या नागरिकांनी केली आहे.
निफाड येथे प्रांत कार्यालय असून सिन्नर हे निफाड उपविभागात येते. त्यामुळे सिन्नरच्या नागरिकांना या कार्यालयात येण्यासाठी ये-जा करावी लागते. शिवाय चांदवड, पिंपळगाव (ब), धुळे, जळगावकडे जायचे असल्यास सिन्नरकरांना निफाडमार्गे जवळच्या मार्गाने जावे लागते. शिवाय निफाडच्या जनतेला पुणे, संगमनेरकडे जायचे असल्यास सिन्नरमार्गे जावे लागते. निफाड-सिन्नर हे भौगोलिकदृष्ट्या जोडून तालुके असल्याने दोन्ही तालुक्यातील नागरिकांची ये-जा सातत्याने चालू असते. गेली ३० वर्षे झाली. सिन्नर-चांदवड ही एकमेव बस निफाडला येण्यासाठी आहे.
सदर बस सिन्नर-बारागाव पिंप्री, म्हाळसाकोरे, मांजरगाव, सायखेडा, चांदोरी, खेरवाडी, कसबे सुकेणे, निसाकामार्गे निफाडला अशा मोठ्या लांबच्या मार्गाने निफाडला सकाळी १०.१५ ला येते. मग चांदवडला जाते हीच बस परत चांदवडहून सिन्नरला जाण्यासाठी दुपारी १.३० ला निफाडला येते. परंतु निफाडला कुणीही प्रवासी परत वरील लांबच लांब मार्गाने या बसने सिन्नरकडे जात नाही, त्यापेक्षा खासगी वाहनाने नागरिक सिन्नरला जाणे पसंत करतात. निफाड-कोठुरे-करंजगाव-मांजरगाव, म्हाळसाकोरे, सिन्नरचे निमगाव, बारागाव पिंप्री हा मार्ग सर्वात जवळचा, सोईचा, वेळेची बचत करणारा आहे. याच मार्गावरून निफाड-सिन्नर ही फेरा बस सुरू करावी. दिवसभरात या बसचे चार फेरे केल्यास दोन्ही तालुक्यांतील प्रवाशांचा गंभीर प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील पश्चिम आणि उत्तर भागातील जनतेची सिन्नरकडे ये-जा करण्याची समस्या दूर होईल.
यापूर्वी लासलगाव डेपो मॅनेजर यांच्याकडे निफाडकरांनी निफाड-सिन्नर फेरा बस सुरू करण्याची मागणी केलेली आहे; मात्र डेपो प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून जनतेच्याच रेट्यामुळे पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थी, व्यापारी वर्गासाठी लासलगाव पुणे ही बस निफाड-सिन्नरमार्गे सुरू करण्यात आली. ती बस निफाडला सकाळी ६.३० ला येते. या बसला प्रवाशांचा प्रतिसाद आहे. कधीकधी बस पुणे प्रवाशांनी भरल्याने बऱ्याच प्रवाशांना या बसने जाता येत नाही. सिन्नरला जाण्यासाठी
दिवसभर बसच नसल्याने उरलेल्या प्रवाशांना मग नाशिकला जाऊन मग पुण्याकडे बसने प्रयाण करावे लागते. (वार्ताहर)

Web Title: Disadvantage of Niphad to Sinnar Passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.