नायगाव खोऱ्यातील प्रवाशांची गैरसोय
By admin | Published: August 21, 2016 11:05 PM2016-08-21T23:05:36+5:302016-08-21T23:07:26+5:30
सायखेडा : मार्गावरील बसचे नियोजन करण्याची मागणी
नायगाव : गेल्या महिनाभरापासून सिन्नर-शिर्डी मार्गावरील बसेसच्या नियोजनात बदल करण्यात आल्याने नायगाव खोऱ्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. सिन्नर आगाराने याबाबत नियोजन करण्याची मागणी होत आहे.
सिन्नर-नायगाव-सायखेडा या महत्त्वाच्या मार्गावर दिवसभरात फक्त चारच बस धावत असल्याने परिसरातील प्रवाशांचे आधीच हाल होत आहेत. त्यातच गेल्या महिनाभरापासून सिन्नर आगारातून सिन्नर-सायखेडा-ओझर व सिन्नर-सायखेडा या दोन बसेस सकाळी साडेसहा व ८ वाजता नायगावमार्गे ओझर व सायखेडा येथे जातात. या गाड्या पुन्हा याच मार्गे प्रवास करताना नायगाव येथून कधी सोबत तर कधी दहा-पंधरा मिनिटांच्या अंतराने जातात. सिन्नरकडे जाणाऱ्या या दोन्ही सकाळी ९ वाजेच्या अगोदरच सिन्नरला परतत असल्याने नायगावसह परिसरातील जायगाव, जोगलटेंभी, सोनगिरी, देशवंडी आदी गावांतील नागरिकांना दिवसभरात सिन्नरकडे जाण्यासाठी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पूल अवजड वाहनांना बंद केल्याने सिन्नरहून जाणाऱ्या दोन्ही बस सायखेड्यापासूनच पुन्हा सिन्नरकडे फिरतात. दोन्ही बस बरोबरच येत असल्याने व सकाळी नऊ वाजेनंतर या रस्त्यावरुन पुन्हा बस नाही. सिन्नर आगाराच्या या नियोजनशून्य कारभाराचा नायगाव खोऱ्यातील प्रवाशांना फटका बसत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सिन्नर बसस्थानक प्रशासनाने यामार्गावरील बसचे फेरनियोजन करुन नवीन बसच्या फेऱ्या सुरु करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे. (वार्ताहर)