परीक्षेपासून विद्यार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:44 AM2018-12-21T01:44:24+5:302018-12-21T01:44:45+5:30
वडाळारोडवर सिनिअर प्रोफेसरच्या नेट परीक्षेला राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारण्यात आल्याने या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून मुंबई नाका पोलिसांना बोलावून या विद्यार्थ्यांची समजूत काढण्यात आली.
इंदिरानगर : वडाळारोडवर सिनिअर प्रोफेसरच्या नेट परीक्षेला राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारण्यात आल्याने या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून मुंबई नाका पोलिसांना बोलावून या विद्यार्थ्यांची समजूत काढण्यात आली.
वडाळारोडवर १८ ते २१ डिसेंबरपर्यंत सिनिअर प्रोफेसर या पदाच्या नेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारपासून या परीक्षा सुरू असून, या परीक्षार्थींना सकाळी नऊ वाजेच्या पूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र या परीक्षेसाठी राज्याच्या विविध ठिकाणांहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्यास उशीर झाला. परीक्षा केंद्रावर पाच ते दहा मिनिटे उशीर झाल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आला होता.
त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांजवळ फोटो, आधार कार्ड, हॉल तिकीट या गोष्टी नसल्याने या विद्यार्थ्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला. ही परीक्षा आॅनलाइन पद्धतीने असल्याने यात कोणताही हस्तक्षेप करता येत नसल्याचे आयोजकांनी म्हणणे होते. प्रशासन या विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्यास ठाम असल्याने या विद्यार्थ्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. अखेर मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांना पाचारण करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. ही परीक्षा आॅनलाइन असून याठिकाणी नियोजित वेळेनंतर विद्यार्थ्यांना सोडता येऊ शकत नाही. परीक्षा केंद्रावर सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. उशिरा आलेल्यांना सोडता येणार नाही, असे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी आमचे वर्ष वाया जाईल त्यामुळे ही संधी द्यावी, अशी विनंती केली. मात्र निर्णयात बदल करण्यात आला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित रहावे लागले.