महामंडळाचे अध्यक्ष अन् संमेलनाच्या कार्याध्यक्षांमधील मतभिन्नता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:15 AM2021-03-05T04:15:29+5:302021-03-05T04:15:29+5:30

नाशिक : नाशिकला होणारे साहित्य संमेलन आता अवघ्या तीन आठवड्यांवर आले असताना कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला सरासरी ४००हून अधिक वाढत ...

Disagreement between the president of the corporation and the working president of the meeting | महामंडळाचे अध्यक्ष अन् संमेलनाच्या कार्याध्यक्षांमधील मतभिन्नता

महामंडळाचे अध्यक्ष अन् संमेलनाच्या कार्याध्यक्षांमधील मतभिन्नता

Next

नाशिक : नाशिकला होणारे साहित्य संमेलन आता अवघ्या तीन आठवड्यांवर आले असताना कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला सरासरी ४००हून अधिक वाढत आहे. अशा परिस्थितीत संमेलन व्हावे की होऊ नये, याबाबत चर्चेला बहर आला आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील हे संमेलन होणारच अशी वक्तव्ये करीत असतानाच येत्या दोन-तीन दिवसांत शासनाकडून काही मार्गदर्शन मिळेल, त्यानंतरच शासन, महामंडळ आणि आयोजक लोकहितवादी संस्था मिळून निर्णय घेऊ, असा सूर कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी आळवला असल्याने संमेलनाच्या दोन प्रमुखांमधील मतभिन्नता समोर आली आहे.

कोराेनाच्या कालावधीत संमेलन घेण्याचे धाडस नाशिकच्या आयोजक संस्थेने दाखवले आहे. कोरोना असतानाच नाशिकच्या लोकहितवादी मंडळाने संमेलनाचे आव्हान स्वीकारले असून, सर्व प्रकारची खबरदारी घेऊनच संमेलन घेण्यात येणार असल्याचा दावा महामंडळ आणि लोकहितवादी मंडळाने प्रारंभापासूनच केला आहे. त्यासाठीची सर्व जय्यत तयारी पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असले तरी नाशिकमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच परिस्थिती निवळण्यासाठी तब्बल तीन आठवड्यांचा कालावधी आहे. त्यामुळे तोपर्यंत परिस्थितीत फरक पडण्याची आशा असल्याचा महामंडळाच्या अध्यक्षांचा दावा आहे. तसेच स्वागताध्यक्ष आणि नाशिकचे पालकमंत्री जरी बाधित असले तरी ते नाशिकमधील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने त्यांच्याशी चर्चा करूनच सारे काही होणार आहे. त्यामुळेच संमेलन होण्याबाबत संभ्रम निर्माण केला जाऊ नये. यंदाचे संमेलन निर्धारित २६ ते २८ मार्चदरम्यानच आयोजित करण्याचा आमचा इरादा कायम असल्याचा दावा ठाले पाटील यांनी केला आहे.

इन्फो...

साहित्य संमेलनाचे आयोजन हे शासन आदेशाच्या चौकटीतच केले जाते. त्यामुळे येत्या २-३ दिवसांत शासनाकडून काही अधिकृत दिशानिर्देश प्राप्त झाल्यानंतर राज्य शासन, साहित्य महामंडळ आणि आयोजक लोकहितवादी मंडळाची स्वागत समिती मिळूनच त्याबाबतचा निर्णय घेऊ शकणार आहेत. शासनाकडून दिशानिर्देशाबाबत स्पष्टता आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल.

- हेमंत टकले, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Web Title: Disagreement between the president of the corporation and the working president of the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.