गाळ उपसाबाबत दोन अधिकाऱ्यांत विसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 01:21 AM2021-06-05T01:21:13+5:302021-06-05T01:21:33+5:30
भालूर धरणातला गाळ उपसण्यासाठी गेलेले जेसीबी व डंपर शुक्रवारी (दि.४) सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत धरण परिक्षेत्रात प्रांताधिकारी यांच्या आदेशावरून थांबविण्यात आले होते. मात्र, संबंधितांना तहसीलदारांनी परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांमधील विसंवादाचे दर्शन यावेळी घडले.
नांदगाव : भालूर धरणातला गाळ उपसण्यासाठी गेलेले जेसीबी व डंपर शुक्रवारी (दि.४) सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत धरण परिक्षेत्रात प्रांताधिकारी यांच्या आदेशावरून थांबविण्यात आले होते. मात्र, संबंधितांना तहसीलदारांनी परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांमधील विसंवादाचे दर्शन यावेळी घडले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रांत सोपान कासार यांनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे उभ्या असलेल्या वाहनांना अडवून गाळ काढण्याची परवानगीची कागदपत्रे मागितली. परंतु कागदपत्रे वाहनधारक दाखवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी तलाठी शिरसाठ यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान तहसीलदार उदय कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संबंधितांना गाळ उपसण्याची परवानगी दिली असल्याची माहिती दिली.
तलाठीही परवानगीबाबत अनभिज्ञ
गाळ उपसण्याची परवानगी तहसीलदार देतात. त्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून शिफारस आवश्यक असते. धरणातून गाळ काढण्याची परवानगी अनेक शेतकऱ्यांना देण्यात येत असते. गाळ केवळ शेतात वापरण्यासाठीच परवानगी दिली जाते. दरम्यान, तहसीलदारांनी परवानगी दिली असेल तर त्याची माहिती प्रांतांना का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात असून, पंचनामे करणारे तलाठी शिरसाठ यांनासुद्धा अशी परवानगीची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.