मतभेद मिटले, आता मनभेदही नष्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 02:31 AM2021-01-12T02:31:07+5:302021-01-12T02:31:49+5:30
मूळ पक्षाचेच असलेले नेते काही कारणास्तव घरापासून दुरावले, पुन्हा स्वगृही परतले, त्यामुळे आगामी काळात सेनेला सुगीचे दिवस असून, मतभेद मिटले, आता मनभेदही नष्ट झाल्याची भावना शिवसेनेत नुकताच प्रवेश घेतलेल्या सुनील बागुल व वसंत गिते यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने उपस्थितांनी व्यक्त केली.
नाशिक : मूळ पक्षाचेच असलेले नेते काही कारणास्तव घरापासून दुरावले, पुन्हा स्वगृही परतले, त्यामुळे आगामी काळात सेनेला सुगीचे दिवस असून, मतभेद मिटले, आता मनभेदही नष्ट झाल्याची भावना शिवसेनेत नुकताच प्रवेश घेतलेल्या सुनील बागुल व वसंत गिते यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने उपस्थितांनी व्यक्त केली.
पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपला आगामी काळात धडा शिकविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी बागुल यांनी, मी पक्षापासून दूर गेलो, असे वाटले नाही. मात्र, ज्या-ज्या पक्षात गेलो, तेथील कामाची सारी पद्धतच आपण अवगत केली असून, या पद्धतीचा उपयोग आता सेनेत काम करताना कामी येणार आहे, असे सांगितले. वसंत गिते यांनी, आपण मूळ शिवसेनेचे आहोत, राज्यात शिवसेनेचे सरकार असल्यामुळे आपल्यावर मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले.
यावेळी उपनेते बबन घोलप यांनी, पक्षात साऱ्यानाच पदे हवी असतात, परंतु सर्वांनाच ते देणे शक्य नसते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे सांगितले, तर जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी भाजपवर तोफ
डागून पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपचा काटा काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आल्याचे सांगितले. यावेळी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, रंजना नेवाडकर,
विनायक पांडे, दत्ता गायकवाड,
अजय बोरस्ते, विलास शिंदे,
सत्यभामा गाडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
शुद्धीकरण... : भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेल्या सुनील बागुल आणि वसंत गिते यांचा स्वागत सोहळा पार पडला. यावेळी नव्या जीवनशैलीच्या नव्या प्रथेनुसार जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सुनील बागुल यांचे सॅनिटायझरने हात स्वच्छ केले. नव्या प्रकारचे हे राजकीय शुद्धीकरण असल्याची चर्चा रंगली होती.