पावसाचे निराशाजनक आगमन
By Admin | Published: June 20, 2016 11:40 PM2016-06-20T23:40:51+5:302016-06-21T00:10:18+5:30
रिमझिम सरी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
सिन्नर : मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा सोमवारी पल्लवित झाल्या. सोमवारी दुपारी सिन्नरसह ग्रामीण भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे पाऊस पडता झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र पावसाने दमदार सलामी न दिल्याने पावसाचे आगमन निराशाजनकच झाले.
ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट, जोरदार वादळवारा अशा नेहमीच्या आर्विभावात पावसाचे आगमन न होता केवळ रिमझिम सरी कोसळल्या. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असले तरी पावसाने सिन्नरसह तालुक्याला हुलावणी दिल्याचे चित्र होते. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे जोरदार पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. मात्र दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरासह तालुक्यात पावसाचे आगमन झाले. मात्र पावसात जोर नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.
तालुक्यातील चास, दोडी, गोंदे, माळवाडी या गावांमध्ये दुपारी रिमझिम पाऊस झाला. पांगरी, वावी, देवपूर, पंचाळे, मिठसागरे, मुसळगाव, गुळवंच या भागातही केवळ रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वाटत होती. मात्र रिमझिम पाऊसवगळता जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.
गेल्या पाच वर्षापासून सिन्नर तालुक्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले आहे. यावर्षी टंचाईचा सामना करताना प्रशासनासह सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यात यावर्षी २० जून उजाडल्यानंतरही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी व प्रशासन हवालदिल झाले आहे. यावर्षी शहरासह ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा जास्त बसल्या.(वार्ताहर)