बबन घोलप यांच्यावरही नाराजी
By admin | Published: February 6, 2017 11:19 PM2017-02-06T23:19:04+5:302017-02-06T23:19:22+5:30
घराणेशाहीचा आरोप : ठाकरे यांच्याकडे मांडणार गाऱ्हाणी
नाशिक : तिकीट वाटपाच्या गोंधळावरून शिवसेनेच्या शहर आणि जिल्हाध्यक्षांवर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असताना आता नाशिकरोडमधील काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी माजी मंत्री, शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांच्यावरही उघड नाराजी व्यक्त केली आहे. घोलप यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून आपल्या दोन्ही कन्यांना उमेदवारी मिळवून दिल्याने त्यांच्या विरोधात निष्ठावान एकवटले असल्याचे समजते. शिवसेनेत आता घराणेशाहीचा शिरकाव झाला असून, तिकीट वाटप करताना भेद करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तिकीट वाटप करताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निष्ठावान शिवसैनिकांचा विचार न करता काल-परवा पक्षात आलेल्या आणि पक्षाच्या विरोधात आयुष्यभर काम केलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. इतके नव्हे तर पैसे घेऊन तिकिटे वाटप करण्यात आल्याचा आरोप पक्षाच्याच एका ज्येष्ठ नेत्याने केला होता. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर त्यांनी गैरसमज झाल्याचे म्हटले असले तरी तिकीट वाटपावरून सेनेची घोडेबाजार ही चर्चा मात्र लपून राहिलेली नाही. नाशिकरोडमध्ये सेनेची मोठी ताकद असून देवळालीगाव, जेलरोड हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. नाशिकरोडमध्ये माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या शब्दला किंमत असल्याने शिवसेनेच्या अंतर्गत निर्णयात घोलप यांचीही भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण राहिली आहे. शिवसेनेचे जिल्हा आणि शहराध्यक्षाबरोबरच घोलप यांनीही आपल्या अनेक समर्थकांना आणि निष्ठावान सैनिकांना तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या इर्षेने कार्यकर्ते कामालाही लागले होते. परंतु ऐनवेळी पक्षाने बाहेरून आलेल्यांना तिकिटे दिली आणि ज्यांनी पक्षात २५ ते ३० वर्ष काम केले त्या निष्ठावानांना मात्र काहीच दिले नाही. यावरून नाशिकरोडमध्ये पक्ष पदाधिकाऱ्यांसह घोलप यांच्याविरुद्धही नाराजी पसरली आहे. या प्रकारानंतर घोलप यांनी अनेकांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी घोलप यांची भेटही नाकारल्याची चर्चा आहे. दरम्यान, घोलप यांच्याकडून निष्ठावंतांना बाजूला सारण्यात आल्याप्रकरणी सर्व नाराज एकत्र आले असून, ते सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. नाशिकरोडमधील तिकीट वाटपात घोलप यांचा अतिहस्तक्षेप असल्याचा संशय शिवसैनिकांनीच व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)