पेन्शन वाढ न केल्याने सेवानिवृत्तांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:25 AM2019-02-04T00:25:07+5:302019-02-04T00:37:28+5:30
दिंडोरी : नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात डॉ. कोशियारी कमिटीच्या अहवालानुसार ईपीएस पेन्शनर्स यांना किमान तीन हजार पेन्शन केले जाईल, ...
दिंडोरी : नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात डॉ. कोशियारी कमिटीच्या अहवालानुसार ईपीएस पेन्शनर्स यांना किमान तीन हजार पेन्शन केले जाईल, अशी अपेक्षा पेन्शनर्स यांना होती मात्र याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने पेन्शनर्समध्ये नाराजी असून, शासनाने त्वरित तीन हजार पेन्शन त्वरित सुरू करावे, अशी मागणी जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनने केली आहे.
याबाबत पेन्शनर्स फेडरेशनने केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री संतोषकुमार गंगवार यांना निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की भाजपाने २०१४ ला पेन्शनवाढीचे आश्वासन दिले होते.
भाजपा खासदारांच्या अध्यक्षतेखाली डॉ. कोशियारी कमिटीने सुचवलेल्या शिफारसी अंमलात आणल्या नाही. १९९५ ते २०१८ मध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन खूप कमी आहे. आजच्या महागाईच्या जमान्याचा विचार करता डॉ. कोशियारी समितीने रु. ३००० पेन्शन व त्याला महागाई भत्ता मिळणे आवश्यक असताना अर्थसंकल्पात त्याची तरतूद नाही तरी अर्थसंकल्प चर्चेत सदर मागणीचा विचार करावा तसे न केल्यास सेवानिवृत्त कर्मचारी ‘नो ओशियारी, नो वोट मोहीम’ राबवतील, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर संस्थेचे संस्थापक राजू देसले, जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजटली, डी. बी. जोशी, प्रकाश नाईक, दिंडोरी अध्यक्ष साहेबराव शिवले, रत्नाकर दुगजे, संताजी जाधव, बाळासाहेब खराटे, अरुण कावळे, वसंत कदम, रंगनाथ गांगुर्डे आदींच्या सह्या आहेत.