नाशिक रोडला ज्येष्ठांची निराशा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:15 AM2021-05-09T04:15:36+5:302021-05-09T04:15:36+5:30
येथील मनपाचे सर्व लसीकरण केंद्रे शनिवारी लसीअभावी बंद राहिल्याने लस घेण्यास आलेल्या सर्व नागरिकांची निराशा झाली. खोले मळा येथील ...
येथील मनपाचे सर्व लसीकरण केंद्रे शनिवारी लसीअभावी बंद राहिल्याने लस घेण्यास आलेल्या सर्व नागरिकांची निराशा झाली. खोले मळा येथील केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र वगळता अन्य केंद्रे शनिवारी बंद होती. ४५ वर्षांपुढील नागरिकांनी या केंद्रावर लस मिळेल या आशेने धाव घेतली. मात्र, त्यांची निराशा झाली.
नाशिक रोड येथील मनपाची सर्व कोविड लसीकरण केंद्रे शनिवारी ४५ वर्षे व त्यापुढील वयोगटातील नागरिकांसाठी बंद होती. त्यामुळे सकाळपासून रांगेत नंबर लावून बसलेल्या नागरिकांची मोठी निराशा झाली. लसीचा पुरवठा झाल्यानंतर पुढील सूचना देण्यात येईल. नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असे बोर्डवर नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे रविवारी लसीकरण होईल की नाही हे माहीत नाही, असेही लिहिण्यात आल्याने नागरिक नाराज झाले.
नाशिकसाठी पुण्याहून लस येते. ती जिल्हा परिषदेकडे जमा झाल्यावर तेथून जिल्ह्यातील सर्व केंद्रांना वितरित होते. गेल्या आठवड्यात शनिवारी १ मे रोजी महाराष्ट्र दिनाची तर रविवारी साप्ताहिक सुटी होती. सोमवारी आणि मंगळवारी पुण्याहून नाशिकसाठी लस आलीच नाही. त्यामुळे नागरिकांनी केंद्रावर गोंधळ घातला. बुधवारी, गुरुवारी व शुक्रवारी प्रत्येक केंद्रावर फक्त शंभरच डोस आले. त्यातही वशिलेबाजी करण्यात लोक अग्रेसर होते. त्यामुळे नागरिकांनी काही ठिकाणी केंद्रप्रमुखांना घेराव घातला होता. या आठवड्यातही शनिवारी लस आली नाही. रविवारी येण्याची शक्यता नाही. सोमवारी लस घेण्यासाठी केद्रांवर गर्दी झाल्यास सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू शकतो. लसीचा तुटवडा सर्वत्र भासत असल्याने ही गोष्ट लक्षात घेऊन केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे. नाशिक रोडला जुने बिटको रुग्णालय, गोरेवाडी, सिन्नर फाटा, जेल रोड-पंचक, उपनगर, खोले मळा, वडनेर गेट, पिंपळगाव खांब येथे लसीकरण केंद्रे आहेत. खोले मळा येथे फक्त १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केले जाते. त्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते. हे केंद्र वगळता अन्य केंद्रे शनिवारी बंद होती. ४५ वर्षांपुढील नागरिकांनी या केंद्रावर लस मिळेल या आशेने धाव घेतली. मात्र, त्यांची निराशा झाली. ४५ वर्षांपुढील व्यक्तींनी जुने बिटको रुग्णालय, उपनगर रुग्णालय, सिन्नर फाटा रुग्णालयात संपर्क साधावा, अशी पाटीच तेथे लावल्यानंतरही नागरिक आशेने उभेच होते. उपनगर, जेल रोड - पंचक येथेही नागरिक सकाळपासून लाइन लाऊन होते. काही केंद्रांवर उन्हात उभे राहावे लागते. बसण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येत नाही. त्यामुळे लस केंद्रावर सतत वादविवाद सुरू असतात. पहिली घेतलेली कोव्हॅक्सिन लस गेल्या आठवड्यापासून येत नसल्याने दुसरा डोस घेण्यास येणाऱ्यांना सतत चकरा माराव्या लागत आहेत. लसीचा तुटवडा, शहरात किती डोस येणार याबाबत योग्य नियोजन नसल्याने सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.