सटाणा पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:45+5:302021-06-09T04:16:45+5:30
सटाणा : शहरातील चिखलयुक्त रस्ते, दुरुस्तीअभावी नागरिक वसाहतीतील रस्त्यावर साचलेली पाण्याची डबकी, चोकअप झालेल्या गटारी यामुळे पावसाळ्यातील पालिका प्रशासनाचे ...
सटाणा : शहरातील चिखलयुक्त रस्ते, दुरुस्तीअभावी नागरिक वसाहतीतील रस्त्यावर साचलेली पाण्याची डबकी, चोकअप झालेल्या गटारी यामुळे पावसाळ्यातील पालिका प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन कागदावरच दिसून येत आहे. हा पालिका प्रशासनाचा फार्स मात्र लाखो रुपयांचा महसूल देणाऱ्या नागरिकांच्या मुळावर उठल्याचे बघायला मिळत आहे.
शहरातील वृंदावन कॉलनी, सन्मित्र हौसिंग, श्रमिकनगर, टेलिफोन कॉलनी, शिवाजी कॉलनी या नागरिक वसाहतीतील अंतर्गत रस्ते दुरुस्ती अभावी मोठमोठी खड्डी पडली आहेत. रस्ते कालबाह्य झाल्यामुळे पावसाळ्यात कधी काळी चिखलमुक्त झालेला हा परिसर चिखलयुक्त झाल्याचे अनुभवायला मिळत आहे. पावसाळ्यात साचत असलेल्या या डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर दुसरीकडे जीव धोक्यात घालून रहिवाशांना चिखलयुक्त रस्त्यांवरून मार्गक्रमण करावे लगत आहे. गटारीची अवस्थादेखील यापेक्षा वेगळी नाही. ताहाराबाद रस्ता, मित्रनगर, नामपूर रोड, साठफुटी रस्ता या प्रमुख रस्त्यावरील गटारी वेळीच स्वच्छ केल्या जात नसल्यामुळे आजच्या घडीला ठिकठिकाणी डबकी साचून दुर्गंधी पसरत आहे. यामुळे स्वच्छ सुंदर सटाणा शहर स्वच्छ शहर आणि सुंदर शहर या घोषवाक्याला एकप्रकारे हरताळ फासला आहे. प्रशासनाने या अनेक दिवसांपासून चोकअप झालेल्या गटारी मोकळ्या कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------------------
काय केल्या प्रशासनाने उपाययोजना...
नगर परिषद क्षेत्रातील ताहाराबाद रोड, कचेरी रोड, यात्रा मैदान परिसरातील मोठ्या गटारी स्वच्छ करण्यात आल्या आहेत. विद्युत प्रवाहास अडथळे आणणारे वृक्षांची डहाळणी करण्यात आलेली आहे. पावसाळी पूर्व जंतुनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे . अग्निशमन सेवा सज्ज ठेवण्यात आलेली आहे . आपत्कालीन व्यवस्थेत प्रथमोपचार गट स्थापन करण्यात आला आहे. शोध पथक तयार करण्यात आलेले आहे. निवारा गट स्थापन करण्यात आलेला आहे. वैद्यकीय सेवेअंतर्गत आपत्कालीन कृतिगट स्थापन करण्यात आलेला आहे.
--------------------------
धोकादायक इमारती....
धोकादायक इमारती खाली करण्याबाबत जाहीर सूचना देण्यात आली आहे. शहरातील नऊ इमारती धोकादायक म्हणून सर्वेक्षित करण्यात आल्या असून संबधितांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत.
-------------------
नगर परिषदेमार्फत आपत्कालीन परिस्थितीसाठी कार्यवाही करण्यात येत आहे. सन २०२०-२१ या अर्थसंकल्पात आपत्कालीन व्यवस्थेसाठी १५.०० लक्ष रुपये तातडीची तरतूद करण्यात आलेली आहे.
- सुनील मोरे, नगराध्यक्ष
------------------
सर्व नगर परिषदेची प्रशासकीय यंत्रणा पोलीस प्रशासन व महसूल यांच्या समन्वयाने आपत्कालीन परिस्थितीत कार्यवाहीकरिता सज्ज आहे.
-हेमलता डगळे-हिले, मुख्याधिकारी
------------------
सटाणा शहरातील वृंदावन कॉलनीतील कालबाह्य झालेल्या रस्त्यामुळे खड्डे पडून साचलेले पावसाचे पाणी दुसऱ्या छायाचित्रात तलाठी कॉलनीतील चिखलयुक्त झालेले रस्ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. तिसऱ्या छायाचित्रात दोधेश्वर नाक्यावर चोकअप झालेली गटार. (०८ सटाणा १/२/३)
===Photopath===
080621\08nsk_12_08062021_13.jpg
===Caption===
०८ सटाणा १/२/३