जिल्हा आपत्ती विभागावर पुन्हा ओढवली आपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:20 AM2021-09-08T04:20:00+5:302021-09-08T04:20:00+5:30
नाशिक : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या अर्जुन कुऱ्हाडे यांची पुणे येथे बदली झाल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागावर ...
नाशिक : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या अर्जुन कुऱ्हाडे यांची पुणे येथे बदली झाल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागावर पुन्हा एकदा आपत्ती कोसळली आहे. महिनाभरापूर्वी या विभागाच्या अधिकाऱ्याने तडकाफडकी राजीनामा दिल्याने कुऱ्हाडे याच्याकडे पदभार देण्यात आला होता. आता त्यांचीही बदली झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने त्यांची बदली रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करूनही त्यात त्यांना यश आलेले नाही.
गेल्या २६ जुलै रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी अचानक राजीनामा दिल्याने आपत्ती विभाग चर्चेत आला होता. वाघमारे यांच्या बदलीमागे जिल्हाधिकाऱ्यांशी असलेला बेबनाव कारणीभूत असल्याची चर्चा रंगल्याने या विभागात कुणीची वर्णी लागते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारे यांचा अर्ज मान्य करीत दुसऱ्या नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रण अर्जुन कुऱ्हाडे यांच्याकडे या विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. कुऱ्हाडे यांनीदेखील पदभार घेताच धडक कामाला सुरुवात केली होती.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिशा मिळाली असल्याचे वाटत असतानाच गेल्या महिन्याच्या अखेरीस कुऱ्हाडे यांच्या बदलीचे आदेश निघाले. या आदेशामुळे त्यांचीदेखील धावपळ झाली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनीही नागरी संरक्षण दल विभागाच्या प्रमुखांना तातडीने बदली स्थगित करण्याबाबतचे पत्र ई-मेल केले होते. दरम्यानच्या काळात पुण्याहून बदलून आलेल्या अधिकाऱ्याने नागरी संरक्षण दलाचा कार्यभार घेतल्यामुळे कुऱ्हाडे यांनी बदलीच्या ठिकाणी जाणे क्रमप्राप्त ठरले.
मागील महिन्याच्या अखेरच्या सप्ताहापासून सुरू झालेल्या या नाट्यमय घडामोडीनंतरही जिल्हा आपत्ती विभागाच्या प्रमुखाला आपले कार्यालय सोडावे लागले आणि त्यांनी मंगळवारी (दि.७) पुणे येथे जाऊन पदभार घेतल्याचे वृत्त आहे. जिल्हा आपत्ती विभागाचे पद हे तात्पुरते आणि मानधनावरील असल्यामुळे कुऱ्हाडे यांना परत बोलविण्याबाबत कार्यवाही होण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. कुऱ्हाडे यांचे पद हे वर्ग-१ चे असल्यामुळे त्यांना केवळ आपत्ती विभागाच्या पदावर राहणेही शक्य होणार नाही. त्यामुळे कदाचित पुण्याहून बदलून आलेल्या अधिकाऱ्याकडे आपत्ती विभागाचादेखील पदभार दिला जाण्याची शक्यता आहे.
--इन्फो--
ऐन पावसाळ्यात पद रिक्त
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आपत्ती विभागाची जबाबदारीदेखील या काळात वाढते. दुर्दैवाने याच काळात वाघमारे यांना राजीनामा द्यावा लागाल होता, तर अवघ्या दीड महिन्यात अतिरिक्त जबाबदारी असलेल्या अर्जुन कुऱ्हाडे यांचीदेखील बदली झाल्यामुळे जिल्ह्यावर नामुष्की ओढवली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अतिशय महत्त्वाचे पद रिक्त ठेवणे जिकरीचेदेखील आहे. त्यामुळे आता या विभागाची धुरा कोणाकडे सोपविली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.