अनर्थ टळला : अचानक ब्रेक निकामी झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:14 AM2018-04-27T00:14:04+5:302018-04-27T00:14:04+5:30
खामखेडा : मांगबारी घाटात गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले व मोठा अनर्थ टळला.
खामखेडा : मांगबारी घाटात गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले व मोठा अनर्थ टळला. सटाणा आगाराची सटाणा-पिंपळदर-खामखेडा-विसापूर ही बस नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ७.३० वाजता विसापूरकडे निघाली. पुन्हा विसापूरहून मांगबारी घाटातून सटाण्याकडे येत होती. या बसला सकाळी क्लासेससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. तसेच सध्या लग्नसराई असल्याने ही बस पूर्ण प्रवासी व विद्यार्थ्यांनी भरलेली होती. सटाणा मांगबारी घाट चढत असताना बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बस घाटातून पुढे नेणे शक्य नसल्याचे बसचालक आत्माराम निकम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडीतील प्रवाशांना धीर धरण्याची विनंती केली आणि बस परत मोठ्या चतुराईने मागे उताराच्या रस्त्याने मागे नेत हळूच रस्त्याच्या कडेला उभी केली आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यानंतर रस्त्यावर येणारी-जाणारी वाहने थांबवून चालक निकम यांचे कौतुक करून शाबासकी देऊ लागले. या घटनेची गावात माहिती होताच नागरिकांनी बस बघण्यासाठी गर्दी केली.