सटाणा बाजार समिती सभापतींविरोधात अविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:46 AM2019-05-15T01:46:50+5:302019-05-15T01:49:09+5:30
सटाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध झालेल्या सभापती मंगला प्रवीण सोनवणे यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून धुसफूस सुरू होती, आता त्यांच्यावर अविश्वास ठरावाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. तब्बल बारा संचालक अज्ञातस्थळी रवाना झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे
सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिनविरोध झालेल्या सभापती मंगला प्रवीण सोनवणे यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून धुसफूस सुरू होती, आता त्यांच्यावर अविश्वास ठरावाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. तब्बल बारा संचालक अज्ञातस्थळी रवाना झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वर्षभरापूर्वीच निवडणूक झाली. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर राज्यात झालेली ही पहिलीच निवडणूक ठरली. सातबाराधारकांनी निवडून दिलेल्या संचालकांमधून सभापतीपदी मंगला प्रवीण सोनवणे यांची निवड करण्यात आली. बाजार समितीच्या आतापर्यंतच्या इतिहासात सभापतिपदी प्रथमच महिलेला संधी मिळाली; मात्र वर्ष पूर्ण होण्याच्या आतच संचालक मंडळातील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. एवढेच नव्हे तर बारा ते चौदा संचालकांनी एकत्रित येत अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू केल्याने सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे. अठरापैकी १२ ते १३ संचालक अज्ञातस्थळी रवाना झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. उर्वरित संचालकांपैकी काही त्या गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. सभापती सोनवणे यांच्या घरात विवाह समारंभ असल्याने संपूर्ण कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून विवाहाच्या तयारीत होते. याच गोष्टीचा फायदा उचलत विरोधकांनी संचालकांची मोट बांधल्याचे बोलले जाते. साहजिकच त्यामुळे याविषयीचे गूढ वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत गटातटाचे उफाळून आलेले राजकारण आणि सोनवणे कुटुंबीयांना राजकारणातील पूर्वानुभवाचा अभाव यामुळे विरोधकांना ही संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. अर्थात तरीही अविश्वास ठराव आणण्यामागील नेमके कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. सभापतिपदाच्या निवडीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली झाल्याचे बोलले गेले होते.