अविश्वास टळला, आता बदलीची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:43 AM2018-09-01T00:43:22+5:302018-09-01T00:43:39+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावामुळे निर्माण झालेला जनक्षोभ थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून विशेष महासभा थांबविली आणि पक्षाची प्रतिमाही जपली
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावामुळे निर्माण झालेला जनक्षोभ थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून विशेष महासभा थांबविली आणि पक्षाची प्रतिमाही जपली खरी; परंतु आता मुंढे यांच्या बदलीची शक्यता वर्तविली जात असून, त्यासाठी मुंबई महापालिकेपासून एमएमआरडीए पर्यंत अनेक पर्यायांची चर्चा सुरू आहे. राज्यात आणि महापालिकेत पूर्णत: भाजपाची सत्ता असतानादेखील नाशिकमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय ठरला होता. राज्य शासन आयुक्तांची बदली करू शकत असताना दाखल झालेल्या या अविश्वास प्रकारामुळे जाणकारांमध्ये चर्चेचा विषय ठरला. अविश्वास दाखल झाल्याने नाशिकमध्ये मुंढे समर्थक वाढले आणि सोशल मीडियावरील चळवळीची परिणती वॉक फॉर कमिशनरमध्ये रूपांतर झाले. जनक्षोभ टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश दिले असले तरी नाशिक भाजपामध्ये एकंदरच मुंढे यांच्या विरोधात असलेला रोषही व्यक्त झाला. त्यामुळे आयुक्तांची बदली होऊ शकते असेही सांगितले जात असून, ११ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक बदल्यांना सामोरे गेलेल्या मुंढे यांना हे सारेच अवगत आहे. त्यामुळे आता मुंढे यांना पुढील काळ सुकर जाणार की बदलीला सामोरे जावे लागणार याविषयी चर्चा होत आहे.