अनावश्यक खर्चाला फाटा द्या
By admin | Published: September 8, 2015 10:56 PM2015-09-08T22:56:22+5:302015-09-08T22:59:58+5:30
येवला : मध्यवर्ती गणेश मंडळ समितीच्या बैठकीत आवाहन
येवला : सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन मध्यवर्ती गणेश मंडळ समितीच्या वतीने करण्यात आले. तालुक्यासह महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकरी चिंतातुर झाला आहे. बळीराजाला दिलासा देण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर येवल्यातील हुडको परिसरातील क्रीडा प्रबोधिनी येथे मध्यवर्ती गणेश मंडळ समितीच्या सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत सदस्यांनी विधायक सूचना मांडल्या. यामध्ये अनावश्यक खर्चाला फाटा देऊन मिरवणुकीत डीजेचा वापर करू नका, साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा असे ठरविण्यात आले. भविष्यात अशा प्रकारचे संकट येऊ नये यासाठी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी योजावे लागणारे उपाय यावर चर्चा करण्यात आली. पाणी बचत कशी करता येईल, पाणीसाठा कसा वाढवता येईल, झाडे लावा झाडे जगवा यासारखे विषय घेऊन सजावट व समाजप्रबोधन कसे होईल याकडे लक्ष द्यावे, असे बैठकीत ठरविण्यात आले.
मध्यवर्ती गणेश मंडळाचे प्रमुख किशोर सोनवणे यांनी दरवर्षी मंडळाच्या वतीने उत्कृष्ट व समाजप्रबोधन करणारे देखावे व विविध उपक्र मांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येत असल्याचे सांगून, शहरात अनेक मंडळे सामाजिक,धार्मिक विषयांवर समाजप्रबोधन करतात.
यामुळे भविष्यात गणेशोत्सव हा लोकांना मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडेल, असे स्पष्ट केले. सांस्कृतिकार प्रभाकर झळके यांनी येवला शहर हे उत्सवप्रिय असून, यावेळी पारस
भंडारी, डॉ. भूषण शिनकर, तरंग पटेल, प्रमोद सस्कर, अतुल पैठणकर, आनंद शिंदे, दत्ता महाले, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, रवि पवार, विष्णू कऱ्हेकर, गणेश सोनवणे, उत्तम
घुले, दिलीप बाबर, किरण सूर्यवंशी, राजेंद्र पवार, गौरव कांबळे, नारायण शिंदे, महेश भावसार, किरण सरोदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन २०१४ च्या गणेश आरास स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, असे समितीच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात
आले. (वार्ताहर)