नांदूरमधमेश्वर धरणातून ९ हजार ४६५ क्युसेकने विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 09:35 PM2020-06-15T21:35:31+5:302020-06-15T21:39:58+5:30
नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्गामध्ये वाढ केली जात असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील गोदाकाठालगतच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून दिला जात आहे.
नाशिक : शहरासह जिल्ह्यात गेल्या शुक्र वारपासून मान्सून सरींनी जोरदार हजेरी सुरू आहे. सोमवारी (दि.१५) शहरात ३६.१ मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला. पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात नांदूरमध्यमेश्वर धरणात पूरपाण्याची आवक होत असल्याने या लघुप्रकल्पाची क्षमता आता संपुष्टात आली आहे. यामुळे सातत्याने या धरणातून शुक्र वारपासून विसर्ग सुरू आहे. सोमवारी संध्याकाळपासून विसर्गात वाढ करण्यास सुरूवात झाली. रात्री नऊ वाजेपर्यंत धरणातून ९ हजार ४६५ क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू करण्यात आला होता.
शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सातत्याने पावसाची जोरदार सलामी सुरू आहे. तसेच दारणा धरणातून गोदावरी डावा, उजवा आणि जलद कालव्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे. एकीकडे दारणाचे सुरू असलेले आवर्तन आणि गोदावरीच्या पात्रातून येणारे पूरपाणी यामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधारा लघुप्रकल्पात आवक वाढली असून बंधारा १०० टक्के भरला आहे. यामुळे बंधार्यातून सातत्याने विसर्ग केला जात आहे. गोदापात्रातून हे पाणी थेट जायकवाडीला जाऊन मिळत आहे.
नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्गामध्ये वाढ केली जात असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील गोदाकाठालगतच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून दिला जात आहे. नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाद्वारे दर तासाला नांदूरमध्यमेश्वर धरणातून होणारा विसर्ग अहमदनगर आपत्ती व्यवस्थापनाला कळविला जात आहे. यामुळे नदीकाठालगत सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.