नांदूरमधमेश्वर धरणातून ६ हजार ४५६ क्युसेकने विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 03:06 PM2020-06-14T15:06:30+5:302020-06-14T15:26:59+5:30
शहरात शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत २१.१ मिमी इतका पाऊस झाला तर आज रविवारी सकाळपर्यंत ३१ मिमी पावसाची मागील २४ तासांत नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २२.७८ मिमीपर्यंत मागील २४ तासांत पाऊस पडला.
नाशिक : शहरासह जिल्ह्यात गेल्या शुक्र वारपासून मान्सून सरींनी जोरदार सलामी सुरू आहे. शनिवारी (दि.१३) जिल्ह्यात २२.७८ मिमीपर्यंत पाऊस नोंदविला गेला. सर्वाधिक पाऊस इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, नाशिक या तालुक्यांमध्ये झाला. नांदूरमध्यमेश्वर धरण हे लघुप्रकल्प असून त्याची क्षमता ५५४ दलघफू इतकी असल्यामुळे या धरणातून शुक्रवारपासून सातत्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रविवारी रात्री बारा वाजेपासून या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. १ हजार ६१४ क्युसेकने झालेला प्रारंभ दुपारी १२ वाजता ६ हजार ४५६क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.
शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सातत्याने पावसाची जोरदार सलामी सुरू आहे. तसेच
दारणा धरणातून गोदावरी डावा, उजवा आणि जलद कालव्यासाठी ११०० क्युसेक चे आवर्तन सुरू आहे. एकीकडे दारणाचे सुरू असलेले आवर्तन आणि पाणलोटक्षेत्रात होणारा पाऊस यामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधारा लघुप्रकल्पात पाऊसपाण्याची आवक वाढू लागल्याने बंधारा १०० टक्के भरला आहे. यामुळे बंधाऱ्यातून सातत्याने विसर्ग केला जात आहे. यामुळे मराठवाड्याची तहान भागण्यास मदत होणार आहे. गोदापात्रातून हे पाणी थेट जायकवाडीला जाऊन मिळत आहे. शनिवारी रात्री ११ वाजेपर्यत ३ हजार २२८ क्युसेक इतका विसर्ग या बंधाºयातून पुढे केला जात होता. शनिवारी संध्याकाळपर्यंत विसर्ग कमी करत १ हजार ६१४ क्युसेकपर्यंत आणला गेला; मात्र शनिवारी संध्याकाळी शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. शहरात शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत २१.१ मिमी इतका पाऊस झाला तर आज रविवारी सकाळपर्यंत ३१ मिमी पावसाची मागील २४ तासांत नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २२.७८ मिमीपर्यंत मागील २४ तासांत पाऊस पडला. एकूणच वरूणराजाची समाधानकारक कृपादृष्टी मान्सूनच्या आगमनाने होत असल्याने नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
नांदूरमध्यमेश्वर बंधाºयातून रविवारी रात्री १२ वाजेपासून पुन्हा विसर्ग सुरू केला गेला. हळुहळु हा विसर्ग रविवारी दुपारपर्यंत वाढविण्यात आला. ६ हजार ४५६ क्युसेक इतका विसर्ग रविवारी दुपारी १२ वाजेपासून पुढे दुपारपर्यंत कायम होता. संध्याकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्यास विसर्गामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण नांदूरमध्यमेश्वर बंधारा हा पुर्ण क्षमतेने भरला आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून मागील चार दिवसांपासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ४१३ क्युसेक इतके पाणी पुढे गोदावरीत सोडले गेले असल्याची माहिती जिल्ह्याच्या पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. रविवारी रात्रीपासून सुरू असलेला विसर्ग सोमवारच्या एकूण आकडेवारीत ग्राह्य धरला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.