नांदूरमधमेश्वर धरणातून १ हजार ६१४ क्युसेकचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 09:48 PM2020-06-12T21:48:31+5:302020-06-12T21:57:13+5:30
गंगापूर धरणाच्या परिसरात १०३ तर जवळच्या काश्यपी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० आणि आळंदीमध्ये ७८ मि.मी इतका पाऊस झाला. नाशिक शहरात ५०.८ मिमी पाऊस पडला.
नाशिक : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१२) मान्सून सरींनी जोरदार सलामी दिली. शहरात अवघ्या दीड ते दोन तासांत ५०.८ मिमी इतका पाऊस पडला. त्यामुळे गोदावरीचा जलस्तर उंचावला. नांदूरमधमेश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास धरणातून १ हजार ६१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला.
हवामान खात्याकडून रविवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरूवात होईल असा अंदाज वर्तविला गेला होता; मात्र दोन दिवस अगोदरच मान्सूनने शहरात हजेरी लावल्याने आता बळीराजासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्राच्या बाहेर जोरदार पाऊस झाला. सुमारे दीड ते दोन तास पावसाने शहर व ग्रामिण भागातील गावांना झोडपून काढले. यामुळे गिरणारे, मखमलाबाद, मुंगसरा, मातोरी या गावांसह नाशिक शहरातून गोदावरीत पूरपाणी मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले. यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत निफाड तालुक्याती नांदूरमधमेश्वर धरणात पाण्याची चांगली आवक झाली. पाण्याची पातळी अधिक वाढू नये, म्हणून जलसंपदा विभागाकडून १ हजार ६१४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग औरंगाबादच्या दिशेने गोदावरीत करण्यात आला. गंगापूर धरणाच्या परिसरात १०३ तर जवळच्या काश्यपी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० आणि आळंदीमध्ये ७८ मि.मी इतका पाऊस झाला. नाशिक शहरात ५०.८ मिमी पाऊस पडला. यामुळे या सर्व भागातील पावसाचे पाणी गोदावरीतून मोठ्या प्रमाणात नांदूरमधमेश्वरमध्ये रात्रीपर्यंत पोहचले. यामुळे रात्री साडेनऊच्या सुमारास धरणातून विसर्ग सुरू केला गेला. हे पाणी पहाटेपर्यंत औरंगाबादमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पहाटे जर नाशिक शहरासह ग्रामिण भागात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली तर शनिवारी (दि.१३) नांदूरमधमेश्वर धरणातून सकाळी विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.