गंगापूर धरणातून दीड हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; गोदावरीच्या पातळीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 01:51 PM2020-08-30T13:51:00+5:302020-08-30T13:51:29+5:30
लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे.
नाशिक : गंगापूर धरणातून दीड हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने रामकुंडात देखील मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून येत आहे. नाशिककरांच्या पारंपरिक पूर मापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या पायापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे.
नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला मध्यरात्री देखील पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शनिवारी दुपारी साडेचार वाजेपासून गंगापूर धरणातून तीन हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविला गेला. आज सकाळपासून पावसाने काही प्रमाणात धरणक्षेत्रात उघडीप दिली आहे. सध्या गंगापूर धरणाचा जलसाठा 94 21 टक्के इतका इतका आहे. यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आंबोली, त्रंबकेश्वर, गौतमी, काश्यपी या परिसरात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा निसर्गामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी म्हटले आहे.
दरम्यान तीन दिवसांपासून गंगापूर धरणाचा विसर्ग सुरू होता तो कमी करण्यात आलेला होता. शनिवारी दुपारपासून शहर परिसरात देखील पावसाच्या हलक्या सरींनी रिपरिप सुरू आहे यामुळे गोदावरीच्या पातळीत पावसाचे पाणी देखील येत असल्याने हळूहळू अहिल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे रामकुंडात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढू लागला आहे. सध्या होळकर पुलाखालून पुढे नदीपात्रात दोन हजार 438 हे क्युसेक्स इतका पाण्याचा प्रवाह असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
गंगापूर धरण समूहातील लघु प्रकल्प असलेल्या कश्यपी धरण 62 टक्के तर गौतमी 72 टक्के भरले आहे. पहाटे 6 वाजेपर्यंत गंगापूरमध्ये 16 तर आंबोलीत 33, गौतमीच्या क्षेत्रात 26 आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 19 मिमी इतका पाऊस पडला. गंगापूर धरणात 105दलघफू इतके पूरपाणी पोहोचले. गंगापूर धरणातून 1 हजार 560 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या गोदावरीच्या पात्रात सुरू आहे. दरम्यान, नदीकाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.