दारणा जलाशयातून दोन हजार क्युसेकचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:13 AM2021-07-26T04:13:59+5:302021-07-26T04:13:59+5:30
दरम्यान, रविवारी भावली परिसरात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ...
दरम्यान, रविवारी भावली परिसरात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी आलेल्या पोलिसांनी मज्जाव करीत त्यांना परत पाठविले. तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जलप्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. दारणा धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत धरणातून ६७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. रविवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणाची पातळी वाढत असल्याने दुपारी १२ वाजेनंतर १२९१ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सायंकाळी पुन्हा धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली. त्यामुळे सायंकाळी ६ वाजेनंतर १९८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर कायम असल्याने रात्रीतून आणखी पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
--इन्फो--
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण देखील ओव्हरफ्लो झाल्याने येथूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सकाळी सहा वाजेपासून ७३ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामध्ये सातत्याने वाढ करावी लागत असून रात्रीतून आणखी वाढ केली जाण्याची शक्यता आहे.