पार्टीत सहभागांवर शिस्तभंगाची कारवाई बांधकाम खात्याला शिफारस : पोलीस, उत्पादन शुल्कचे गुन्हे
By admin | Published: February 4, 2015 01:37 AM2015-02-04T01:37:42+5:302015-02-04T01:38:02+5:30
पार्टीत सहभागांवर शिस्तभंगाची कारवाई बांधकाम खात्याला शिफारस : पोलीस, उत्पादन शुल्कचे गुन्हे
नाशिक : ओझर विमानतळावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व मक्तेदारांच्या बहुचर्चित पार्टी प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेत, विनापरवाना वाद्य वाजविल्याबद्दल संबंधितांवर मुंबई पोलीस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करतानाच, मद्यप्राशन परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणीही कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी या प्रकरणी सविस्तर अहवाल मागवून बहुचर्चित पार्टीत सहभागी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवांकडे केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ओझरची पार्टी गाजत असून, त्यात अनेक नवनवीन मुद्यांची व चर्चेची भर पडत आहे. राज्य सरकारने या साऱ्या घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याने व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. वाय. देशमुख तसेच बांधकाम खात्याचे कामे करणाऱ्या ठेकेदारांच्या ‘संबंधा’बाबत चर्चा सुरू झाल्याने सारवा-सारव करण्यास सुरुवात झाली आहे. मद्यपानाच्या पार्टीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील जागा कशी देता येते असा सवाल उपस्थित होताच, घाईगर्दीने ठेकेदार विलास बिरारी याच्याकडून दहा हजार रुपये भाड्यापोटी भरून घेतले आहेत.