आयुक्त लावणार जिल्हाधिकारी कार्यालयाला शिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 02:50 PM2017-11-13T14:50:49+5:302017-11-13T14:51:54+5:30
नाशिक : महिनाभरापूर्वी नुसतीच तंबी देणारे विभागीय आयुक्त महेश झगडे आता जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या कार्यालयाला अचानक भेटी देऊन तेथील फाइलींचा निपटा-याबाबत प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत, मात्र अशी पाहणी करण्यापूर्वी आयुक्तांनी प्रत्येक खाते प्रमुखाकडून फाइलींच्या निपटाºयाबाबत लेखी माहिती पुराव्यासाठी स्वत:च्या ताब्यात ठेवली असून, अधिका-यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कार्यवाही न झाल्याचे आढळले तर मात्र त्यांची खैर राहणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शासकीय कामकाज अधिकाधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने शासन पावले टाकत असताना प्रत्यक्षात अधिका-यांकडून वेळेच्या वेळी कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी आहेत. विशेष करून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महिनो महिने फाइली पडून असल्याच्या थेट तक्रारी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या, त्याचा संदर्भ घेऊनच गेल्या महिन्यात महेश झगडे यांनी नाशिक येथे सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, गट विकास अधिका-यांची बैठक घेऊन त्यांची झाडाझाडती घेतली होती. कामकाज सुधारण्याचा सल्ला देतांनाच झगडे यांनी नियमबाह्य काम करणाºया अधिका-यांना घरी पाठविण्याचा इशाराही दिला होता. त्याची सुरुवात आता करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी सर्व अधिका-यांना दैनंदिन टपाल व फाइलींच्या निपटाºयाबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी त्यांनी दोन लिखीत नमुनेच तयार केले असून, दैनंदिन टपालाची आवक किती, संबंधित अधिकारी टपाल कधी पाहतो, त्याच दिवशी, दुसºया दिवशी की पंधरा दिवसांत अशी विचारणा केली आहे. अशाच प्रकारची विचारणा फाईलींबाबतही करण्यात आली आहे. सर्व अधिका-यांनी स्वत:च ही माहिती आयुक्तांना सादर करावयाची आहे. येत्या आठवड्यात अधिका-यांनी माहिती दिल्यानंतर त्याची खात्री स्वत: विभागीय आयुक्त करणार आहेत.
विभागीय आयुक्तांच्या संभाव्य प्रत्यक्ष पाहणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिका-यांना ‘अलर्ट’ करण्यासाठी चार दिवसांपूर्वी आयुक्त कार्यालयातील उपआयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिका-यांची बैठक घेऊन टपाल व फाइलींच्या निपटा-याबाबत जाणीव करून दिली आहे. विभागीय आयुक्त कोणत्याही कार्यालयाला कोणत्याही दिवशी भेट देऊन टपाल व फाइलींची पाहणी करून संबंधित अधिका-यांना जाब विचारतील अशी पूर्वसूचना सर्व अधिका-यांना दिली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिका-यांची धावपळ उडाली आहे.