कौमार्य चाचणी प्रकरणी महिला आयोगाने मागितला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 01:38 AM2021-11-25T01:38:19+5:302021-11-25T01:40:35+5:30

एका विशिष्ट समाजातील उच्चभ्रू कुटुंबीयांकडून त्र्यंबकेश्वर येथील एका रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. या साेहळ्यापूर्वी समाजातील अनिष्ट रुढी-परंपरेनुसार जात पंचायतीच्या दबावाखाली डॉक्टर नववधूची कौमार्य चाचणी होणार असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीला प्राप्त झाली होती. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशान्वये उपसचिवांनी साधार स्पष्टीकरण करणारा अहवाल सादर करण्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाला पत्र पाठविले आहे.

Disclosure sought by Women's Commission in virginity test case | कौमार्य चाचणी प्रकरणी महिला आयोगाने मागितला खुलासा

कौमार्य चाचणी प्रकरणी महिला आयोगाने मागितला खुलासा

Next
ठळक मुद्देअंनिसकडून तक्रार : ग्रामीण पोलीस कळविणार माहिती

नाशिक : एका विशिष्ट समाजातील उच्चभ्रू कुटुंबीयांकडून त्र्यंबकेश्वर येथील एका रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. या साेहळ्यापूर्वी समाजातील अनिष्ट रुढी-परंपरेनुसार जात पंचायतीच्या दबावाखाली डॉक्टर नववधूची कौमार्य चाचणी होणार असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीला प्राप्त झाली होती. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशान्वये उपसचिवांनी साधार स्पष्टीकरण करणारा अहवाल सादर करण्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाला पत्र पाठविले आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील एका रिसॉर्टमध्ये रविवारी (दि.२१) पार पडलेल्या लग्नानंतर नववधूला कौमार्य चाचणीची ‘परीक्षा’ द्यावी लागणार असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीला (अंनिस) लेखी स्वरूपात प्राप्त झाली होती. यानुसार पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे गाठून याबाबत शहनिशा करून अशाप्रकारची अन्यायकारक कुप्रथा थांबविण्याची मागणी केली होती. यानुसार त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या पथकासह घटनास्थळ गाठून तेथील विवाहसोहळ्याशी संबंधित कुटुंबीयांकडे चौकशी केली. यावेळी संबंधितांकडून लेखी जबाब घेतले गेले. यावेळी जात पंचायतींच्या पंचांनी कानावर हात ठेवत अशी कौमार्य चाचणी होत नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कायद्याची जाणीव करून दिल्यावर अशी कौमार्य परीक्षा होत नसल्याचे व करणार नसल्याचे लेखी लिहून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, याबाबत चाकणकर यांनी मंगळवारी (दि.२३) ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार करत ‘कौमार्य चाचणी’ची बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याचे म्हटले आहे. याबाबत साधार स्पष्टीकरण करणारा सद्यस्थितीदर्शक अहवाल राज्य महिला आयोग कायद्यानुसार पाठविण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

--कोट--

त्र्यंबकेश्वर पोलिसांना प्राप्त झालेल्या निवेदनानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केलेली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून तपासणी अहवाल अधीक्षक कार्यालयाला मिळालेला आहे. तसेच आमच्या गोपनीय विभागाच्या पथकानेही लग्नाच्या एक दिवसाच्या अगोदर पासूनचे रिसॉर्टमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले आहे. पोलीस या लग्नसोहळ्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून होते. तेथे कौमार्य चाचणीसारखी कुप्रथा पार पडलेली नाही. तपासणी रिपोर्टनुसार महिला आयोगाकडे सविस्तर अहवाल सादर करणार आहोत.

- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक

Web Title: Disclosure sought by Women's Commission in virginity test case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.