निफाड, दिंडोरीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:17 AM2019-11-24T01:17:43+5:302019-11-24T01:18:45+5:30
राज्यात अतिशय नाट्यमयरीतीने सकाळी ८ वाजताच स्थापन झालेल्या सरकारचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात झाला असून, त्यांनी सादर केलेल्या पक्षाच्या सर्व ५४ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांच्या पाठिंब्यानेच सरकार स्थापन झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी केला आहे.
नाशिक : राज्यात अतिशय नाट्यमयरीतीने सकाळी ८ वाजताच स्थापन झालेल्या सरकारचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात झाला असून, त्यांनी सादर केलेल्या पक्षाच्या सर्व ५४ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांच्या पाठिंब्यानेच सरकार स्थापन झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी केला आहे. असे असले तरी सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबासमवेतच असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
राज्यात शनिवारी (दि.२३) मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊन सरकार स्थापन केल्यानंतर दिवसभर वेगाने घडलेल्या घडामोडीनंतर रुग्णालायत दाखल असलेल्या मुलाला भेटण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेले निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शुक्रवारीच मुंबईत गेलेलो असताना रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास फोन आला. त्यानुसार सकाळी साडेसात वाजता बोलविण्यात आलेल्या आमदार धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जमले होते. त्यानंतर सर्व राजभवन येथे पोहोचलो. त्याठिकाणी शपथविधी पार पडला. परंतु ही पक्षाची भूमिका असल्यानेच आपण उपस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला. पक्षाचे गटनेते अजित पवार यांना पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांनी त्यांना पक्षाचा नेता म्हणून निवडले असल्याने आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे राष्ट्रवादीचा कोणीही आमदार फुटला अथवा वेगळा गट स्थापन केला असा प्रकार घडला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट करतानाच अजित पवारांची भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका असल्याचेही बनकर यांनी अधोरेखित केले आहे.
राज्यात कोणत्या पक्षाच्या सरकार पाठिंबा द्यायचा हा निर्णय पूर्णपणे पक्षश्रेष्ठींचा असून, पक्षाचे गटनेते अजित पवार यांचाही श्रेष्ठींमध्ये समावेश आहे. त्यांच्या सूचनेनुसारच दहा आमदार धनंजय मुंडे यांच्याकडे आणि राजभवनपर्यंत पोहोचलो. त्यामुळे ही पक्षाचीच भूमिका होती. शपथविधीनंतर आपण सुप्रिया सुळे व शरद पवार यांचीही भेट घेतली असून, पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात कोणत्याही प्रकारची फूट पडली नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार असल्याचे ते म्हणाले.
आमदार संपर्क क्षेत्राबाहेर; दिंडोरीत चर्चेला उधाण
दिंडोरी : राज्यातील सत्तानाट्यात दिंडोरीचे राष्टÑवादीचे आमदार नरहरी झिरवाळ हेही सहभागी झाल्याचे वृत्त येताच मतदारसंघात राष्टÑवादीत अस्वस्थता पसरली. अनेकांनी झिरवाळांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु ते नेटवर्कमध्ये नसल्याने त्यांच्याविषयी संशय अधिक बळावला. त्यांच्या निकटवर्तीयांनी झिरवाळ हे शरद पवारांसोबत असल्याचा निर्वाळा दिला असला तरी, प्रत्यक्ष झिरवाळ ह्यांनी माध्यमांसमोर येऊन कोणताही खुलासा न केल्याने गूढ वाढले आहे. राष्टÑवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी बंड पुकारल्याने राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली. झिरवाळ यांना पहाटे अजित पवार यांचा निरोप आल्याने एकागाडीतून धनंजय मुंडे यांच्याकडे बैठक असल्याचे सांगत नेण्यात आल्याचे त्यांच्यासोबत मुंबईत असलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असल्याचे सांगत लवकरच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. त्यांच्या फेसबुक अकाउण्टवर तशी पोस्टही झळकली. काहीवेळाने
ते मुंबईतील राष्टÑवादीच्या बैठकीला हजर राहणार असल्याची चर्चा होती. परंतु या साºया चर्चांबाबत झिरवाळ यांनी माध्यमांसमोर येत कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने गूढ वाढले आहे.
सकाळी तातडीने राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आमदारांमध्ये दिंडोरीचे राष्टÑवादीचे आमदार नरहरंी झिरवाळ यांचाही समावेश असल्याचे समजताच दिंडोरी मतदारसंघात झिरवाळ समर्थकांसह राष्टÑवादीत अस्वस्थता पसरली. त्यानंतर त्यांना अनेकांनी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मोबाइल स्विच आॅफ असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले.
झिरवाळ पवारांसोबत : पाटील
दिंडोरी : दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे शरद पवार यांच्या सोबतच असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय पाटील यांनी दिली.
मुंबई येथे दोन दिवसांपासून दत्तात्रय पाटील आमदार नरहरी झिरवाळ यांच्या सोबतच होते. पाटील यांनी सांगितले की झिरवाळ हे त्यांचे रूमवर झोपलेले असताना त्यांना अजित पवार यांचा निरोप घेऊन आलेल्या एक व्यक्तीने त्यांना गाडीतून धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी नेले. तेथून राजभवनात सर्व आमदारांसोबत नेण्यात आले. झिरवाळ यांच्याशी आपला संपर्क झाला असून, त्यांनी आपण पक्षासोबतच असल्याचे सांगितले, असेही पाटील यांनी म्हटले आहे.