गणेश मंडळांना सवलतीत वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:05 AM2019-08-22T00:05:12+5:302019-08-22T00:05:38+5:30
काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अनेकदा अधिकृत वीजजोडणी घेतली जात नाही तर याउलट वीजचोरी करून वीज वापरली जाते. अशा जोडणीमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने महावितरणने गणेश मंडळांसाठी सवलतीच्या दरात वीज देण्याचे जाहीर केले आहे.
नाशिक : काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अनेकदा अधिकृत वीजजोडणी घेतली जात नाही तर याउलट वीजचोरी करून वीज वापरली जाते. अशा जोडणीमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने महावितरणने गणेश मंडळांसाठी सवलतीच्या दरात वीज देण्याचे जाहीर केले आहे.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रु पये २७ पैसे अधिक १ रुपये २८ पैसे वहन (व्हिलिंग) आकार असे वीजदर आहेत. सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात वीज वापरली तरीही शेवटच्या युनिटपर्यंत केवळ ४ रुपये ५५ पैसे प्रतीयुनिट एवढाच दर आकारण्यात येतो.
गणेश मंडळांना प्राधान्याने वीजजोडणीसाठी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंडळाच्या वीजभारानुसार सुरक्षा ठेव रक्कम आकारण्यात येणार आहे. गणेश उत्सव संपल्यानंतर ही रक्कम मंडळाच्या खात्यात महावितरणकडून आॅनलाइनद्वारे परतावा करण्यात येणार असून, मंडळाने सुरक्षिततेच्या जबाबदारीबाबत स्वत:चे प्रमाणपत्र (सेल्फ सर्टिफिकेशन), बँक खात्याची माहिती व मोबाइल क्र मांक द्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजयंत्रणेची काळजी घेण्याचे आवाहन
वीजजोडणी तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता आहे. पावसामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजयंत्रणेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे शार्टसर्किट होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे महावितरण कंपनीने गणेश मंडळांसाठी सवलत जाहीर केली आहे.