नृत्यातून अनोखे ‘वारी’ दर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:15 AM2019-09-01T00:15:48+5:302019-09-01T00:16:36+5:30
नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतर्फे आवर्तन संगीत सोहळ्याचे दुसरे पुष्प ‘वारी’ आणि ‘इंद्रायणी’ या नृत्यमैफलीद्वारे रंगले. या संकल्पनेतील नृत्यकलेने भक्तीच्या अनोख्या वारीचे दर्शन नाशिककरांना घडले.
नाशिक : नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतर्फे आवर्तन संगीत सोहळ्याचे दुसरे पुष्प ‘वारी’ आणि ‘इंद्रायणी’ या नृत्यमैफलीद्वारे रंगले. या संकल्पनेतील नृत्यकलेने भक्तीच्या अनोख्या वारीचे दर्शन नाशिककरांना घडले.
प्रथम सत्रात कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी ‘वारी’ ही अभिनव नृत्यरचना सादर केली. कार्यक्रमाचा आरंभ ‘ओम नमोजी आद्या’ या वंदनेने करण्यात आली. त्यानंतर चल गं सखे चल गं सखे पंढरीला, दिंडी चालली... या गाण्यांवर बालिकांनी अत्यंत प्रभावी नृत्यरचना सादर केली. तर ‘संतभार पंढरीत’ या नृत्यातून पंढरीत जमलेल्या संतमंडळींचा आपापसातील मेळ मांडला गेला. विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करणाऱ्या सुंदर ते ध्यान.. या नृत्य सादरीकरणाने करण्यात आली. त्याशिवाय कशी जाऊ मी वृंदावना.. ही गवळणदेखील सादर करण्यात आली.
त्यानंतर कीर्ती भवाळकर दिग्दर्शित ‘इंद्रायणी’ ही नृत्यनाटिका सादर करण्यात आली. तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेल्यानंतरही सदर गाथा जनमानसात रुजल्याचे दाखले देणारी नृत्यनाटिका इंद्रायणीद्वारे साकारण्यात आली. संकल्पना विस्तार स्वाती पाटील आणि जनार्दन केशव यांनी केला आहे. संगीत आनंद ओक, गायक रसिका नातू, गौरी कुलकर्णी यांनी तर वादन रसिक कुलकर्णी, नीलेश गाढवे पाटील यांचे होते. ज्येष्ठ गुरू शांभवी दांडेकर आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या शिष्या अमृता गोगटे यांचे एकलनृत्य सादरीकरण झाले. त्यांना तबल्याची साथ चारुदत्त फडके यांची, पढंतची साथ शीतल लोळगे, संवादिनीची साथ पुष्कराज भागवत यांनी केली. धनेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.