माध्यमिक शिक्षक संघटनांसोबत आज पुन्हा चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:16 AM2021-04-23T04:16:54+5:302021-04-23T04:16:54+5:30
नाशिक राज्य शासनाच्या निर्देशानुसार साथरोगाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासंदर्भातील कामकाजासाठी पाचवी ते आठवीच्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांनी विरोध नोंदविला आहे. ...
नाशिक राज्य शासनाच्या निर्देशानुसार साथरोगाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासंदर्भातील कामकाजासाठी पाचवी ते आठवीच्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांनी विरोध नोंदविला आहे. मात्र, शिक्षण विभागाने पुन्हा पत्राद्वारे या शिक्षकांना चर्चेचे आमंत्रण दिले असून शुक्रवारी (दि.२३) दुपारी साडेतीन वाजता महापालिकेत बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव भामरे, कार्याध्यक्ष साहेबराव कुटे व कार्यवाह आर. डी. निकम यांना शुक्रवारी दुपारी होणाऱ्या चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. त्यानुसार नाशिक शहरातील पाचवी ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शंभर टक्के अनुदानित पदावर काम करणाऱ्या शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाकडून मागविण्यात आली होती. मात्र, नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाकडून शिक्षकांना कोरोना कामकाजासाठी नियुक्तीला विरोध करीत शिक्षकांना कामकाज देऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र, शिक्षण विभागाकडून संघटनेच्या प्रतिनिधींना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नमूद करतानाच यापूर्वी नाशिक मनपा शाळेतील शिक्षक, खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक हे कामकाज करीत असून त्या शिक्षकांना काही प्रमाणात दिलासा मिळावा यासाठी पाचवी ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात चर्चेचे आमंत्रण त्यांनी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.