नाट्य परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:47 AM2019-11-25T00:47:17+5:302019-11-25T00:47:42+5:30
नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक केव्हा होणार? या मुद्द्यावर झालेल्या साधकबाधक चर्चेनंतर नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.
नाशिक : नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक केव्हा होणार? या मुद्द्यावर झालेल्या साधकबाधक चर्चेनंतर नाट्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.
कालिदास कलामंदिरातील परिषदेच्या कार्यालयात सर्वसाधारण सभा प्रारंभी गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे केले जात असल्याने शाखा राज्यात तृतीय क्रमांकावर असल्याचे सांगितले. राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष यांना नाशिक शाखेचा अहवाल आणि आॅडिटसह सर्व बाबी पाठविण्यात आल्यानंतर अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पत्र पाठवून नाशिकची निवडणूक कधी घ्यायची ते तुम्हाला कळवले जाणार असून, त्यानंतरच निवडणूक घेण्याचे निर्देश दिले असल्याचे ढगे यांनी सांगितले.
अध्यक्ष रवींद्र कदम यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण केले. राजेश भुसारे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडण्यासह इतिवृत्ताचे वाचन केले. ईश्वर जगताप यांनी विषयपत्रिकेवरील विविध विषयांचे वाचन केले. रवींद्र ढवळे यांनी निवडणुकीबाबतचा मुद्दा उपस्थित केला. श्याम दशपुते यांनी आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी का नाही? असा सवाल उपस्थित केल्यानंतर सुरेश गायधनी २०१७ साली झालेल्या घटना दुरुस्तीनुसार ७० वर्षांवरील कुणालाही पदाधिकारी बनण्यासाठी मुभा नसल्याचे नमूद केले. यावेळी सचिन शिंदे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, विशाल जातेगावकर, अभय ओझरकर, उमेश गायकवाड, राजेंद्र जाधव, मानसी देशमुख, प्रकाश साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तांत्रिकदृष्ट्या जुन्या घटनेनुसार विद्यमान कार्यकारिणीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असून, त्यानंतरही जोपर्यंत राज्य शाखेकडून निवडणूक घेण्याचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत कार्यकारिणी कार्यरत राहणार असल्याचे सुनील ढगे म्हणाले.